शिर्डी : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने कुटुंबीयांसह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी तिने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला होता. मात्र हा मुकूट चांदीचा असल्याचं समोर आलं आहे.


शिल्पा शेट्टीने काही दिवसांपूर्वी साई बाबांच्या चरणी सोन्याचा मुकूट अर्पण केला होता. मात्र तो मुकूट सोन्याचा नसून चांदीचा आहे. त्यावर सोन्याचा मुलामा दिला होता. मुकुटांचं मुल्यांकन केलं त्यावेळी ही बाब समोर आल्याची माहिती शिर्डी साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिली.


मुकुटाची किंमत 25 लाख रुपये असल्याचं बोललं जात होतं. मात्र मुकूट चांदीचा असल्याने त्याची किंमत 22 हजार रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुकूट सोनेरी दिसत असल्याने तो सोन्याचा असल्याचा भास झाला होता. शिल्पाच्या विनंतीवरुन अर्पण केलेला मुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधानही करण्यात आला होता.


शिल्पा शेट्टीने दान केलेला मुकूट सोन्याचा असल्याचा कधीही दावा केला नव्हता. तसेच तिने दिलेल्या दानाचा साई संस्थानने नम्रपणे स्वीकार केला आहे, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे. शिल्पा ही शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून वर्षातून किमान एकदा तरी ती साई दर्शनासाठी आवर्जून येते.