हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे पोलिसांच्या गाडीत ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गोपाळराव बेंगाळ असं मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबीत करण्यात आलं आहे.


कोळसा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. यामध्ये तेथून जाणाऱ्या ग्रामसेवक गोपाळराव बेंगाळ यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र पोलिसांच्या गाडीमध्ये बसताच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


मात्र पोलिसांनी गाडीमध्ये गोपाळराव बेंगाळ यांना मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती कोळसा येथील गावकऱ्यांना मिळताच शेकडो गावकरी काल रात्रीपासून सेनगांव पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.


त्यानंतर याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आलं आहे. नाना पोले, शंकर जाधव, हेमंत दराडे, विठ्ठल कोळेकर, अमित मोडक यांना निलंबीत करण्यात आलं आहे.  पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी शनिवारी रात्री उशिरा निलंबनाचे आदेश काढले असून अधिक तपास सुरू आहे.