सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभूत झालेल्या शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीच्या काहींनी रसद पुरवली म्हणून माझा पराभव झाला. या बाबत मी वरिष्ठांशी बोलणार आहे, असं शिंदे म्हणाले. तसेच मी राजा नसल्यामुळे मी बिनविरोध होऊ शकलो नाही. शिवेंद्रराजेंनी दादागिरी केली. कारखान्यांना ऊस घेऊन जाणार नाही अशी धमकी दिली, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, साहेबांनी पुरोगामी विचाराचा वारसा जपला. त्याच पुरोगामी विचाराच्या साताऱ्यात माझ्यावर आरोप झाले. मी गाफिल राहिलो ही वस्तुस्थिती आहे. पवार साहेबही बोलले. विधानसभेला मी अपयशी झालो. रामराजेंच्या बंगल्यावर बैठक झाली आणि मी जावलीत उभारण्याचा निर्णय झाला. त्यावेळी माझ्यासोबत 24 लोक होते. मला पाडण्यामध्ये शिवेंद्रराजे यांचा हात आहे. पराभव जरी झाला असा तरी हा माझा नैतिक विजय आहे, असं ते म्हणाले.
शिंदे म्हणाले की, जेथे फिरायला गेले होते तिथून मी मतदार आणू शकलो असतो. शरद पवार, अजित पवारांनी मला निवडून आणण्यासाठी सर्वांना सांगितले होते. मी पॅनेलच्या चौकटी बाहेर नव्हतो, ही माझी बेजबाबदारी होती. पॅनलकडून विश्वासघात झाला असल्याचं देखील शिंदे म्हणाले. चर्चेत एका बाजूला घूस लावायची आणि दुसरीकडे पडद्यामागचे नाचताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते, असं शिंदे म्हणाले.
ते म्हणाले की, पक्ष म्हणून एकत्र काम केले. सर्व पक्षीय पॅनेलमध्ये उदयनराजेंना घेतले. अशी कोणती जादूची कांडी फिरली. त्यांनी दररोज आगपाखड केली आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केला. तरीही पक्षाच्या चौकटी बाहेर जाऊन काम करणार नाही, असं शिंदे म्हणाले.