रायगड : 400 पार ते म्हणता, तर मग नितीश कुमार तुम्हाला का लागले? हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अटक आणि अजित पवार यांना क्लीन चिट, हीच मोदी (PM Modi) गॅरेंटी आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. देशातील विरोधी पक्षातील नेते आणि सरकारवर ईडीच्या धाडीवर धाडी सुरु असल्याने उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत.
दुसऱ्या दिवशी लालू यादवांना समन्स
उद्धव ठाकरे म्हणाले की, नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत गेले आणि दुसऱ्या दिवशी तेजस्वी यादव, लालू यांना ईडी समन्स ही मोदी गॅरेंटी आहे. ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही लढाई आहे. त्यांनी सांगितले की, मोदी यांच्या थापा तुम्ही लोकांना सांगा, प्रचंड पैसा जाहिरातीवर खर्च केला आहे. जनसंवाद माझा नाही तुम्ही एकमेकात संवाद करा, आणि जनतेसमोर सत्य येऊ द्या. सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे आवाहन त्यांनी केले.
ठाकरेंचा अजित पवार यांना टोला
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हाच धागा पकडत ठाकरे यांनी अजित पवार यांना दुसऱ्यांदा मिळालेल्या क्लीनचिटवरून हल्लाबोल केला. सोरेन यांना अटक आणि अजित पवार यांना क्लिनचीट, या भाजपत प्रवेश करा, हीच मोदींची गॅरेंटी असल्याचा घणाघात ठाकरे यांनी केला.
मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत असेल तर तो बिनडोक
ते म्हणाले की, राम मंदिर उभारले गेलं याचा आनंद आहे. हा राम मोदींची प्रॉपर्टी नाही. या सोहळ्यामध्ये एक निर्बुद्ध मोदीला देव मानत असेल आणि मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत असेल तर तो बिनडोक आहे. ते कोणी असू द्यात, ते बिनडोक आहेत, अशा शब्दात त्यांनी गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या तुलनेवरून समाचार घेतला. हे सरकार मणिपूरमध्ये जात नाही, बोलायला तयार नाहीत त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी अशी टीका त्यांनी मोदींवर केली.
अजित पवारांना दुसऱ्यांदा दिलासा, ईडीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह
शिखर बँक घोटाळा प्रकरणात (Maharashtra State Co Operative Bank Scam Case) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक वजनदार नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याच गुन्ह्याच्या आधारे ईडीचा तपास सुरू आहे. रोहित पवारांचीदेखील याच प्रकरणात सध्या ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता ईडीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या