Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला (Shardiya Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे. 


आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" (Mata Surakshit Tar Ghar Surkshit) हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 






सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनं राज्यभरात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवलं जाणार आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे. 


या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी होईल. वैद्यकीय अधिकारी स्वत तपासणी करतील. आजारी महिलांना उपचार आणि आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.


ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञ तपासणी करणार आहेत.  कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक तज्ज्ञांची शिबिरे घेण्यात येणार आहेत. भरारी पथकाच्या माध्यमातून या अभियानावर लक्ष ठेवलं जाणार आहे.  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकं देखील शाळांमध्ये आरोग्य तपासणी करणार आहेत. नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही या दरम्यान माहिती देण्यात येणार आहे.



इतर महत्वाच्या बातम्या



Navratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात! ठिकठिकाणी देवीचे आगमन, जाणून घ्या घटस्थापना पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र