मुंबई : महात्मा गांधींजींबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शरद पवारांनी केली आहे. याबाबतचं तसं पत्र शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलंय. नोटांवरुन गांधीजींचा फोटो हटवण्याची मागणी निधी चौधरी यांनी केली होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असं कृत्य करणं गंभीर असल्याचंही पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

नोटांवरुन महात्मा गांधींचे फोटो हटवण्याची मागणी करत ट्विटरवर नथुराम गोडसेचे आभार मानल्यामुळे मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ट्वीट वादग्रस्त ठरत असल्याचं लक्षात येताच निधी चौधरींनी ट्वीट डिलीट करुन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.



'150 व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारी इमोजी) आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. 30.01.1948' अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता.



17 मे रोजी केलेलं आपलं ट्वीट वादाला कारणीभूत ठरत असल्याचं लक्षात येताच त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी काही ट्वीट्स केली आहेत. 'काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही'




दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरी यांची महापालिकेच्या सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

कोण आहेत निधी चौधरी?

निधी चौधरी या 2012 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

कोण होता नथुराम गोडसे?

नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जबाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथीदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला.

त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.