सांगोला :  शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. आज दुपारी वाजता शरद पवार सांगोला मधील गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी गणपतराव यांच्या पत्नी रतनबाई, मुलगा चंद्रकांत ,पोपटराव , मुलगी शोभा पाटील, नातू  डॉ अनिकेत व डॉ बाबासाहेब उपस्थित होते.  यावेळी पवार देखील गणपतराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरून गेले होते. 



यावेळी शरद पवार म्हणाले की,  माझ्या घरात सर्व शेकापचे आणि मी एकटा काँग्रेसमध्ये असल्याने शेकापमधील दिग्गज नेत्यांची वर्दळ घरी असायची असे पवार यांनी सांगितले.  आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबत आपण अनेक वर्षे राजकीय क्षेत्रांमध्ये काम केले आहे. स्वच्छ चारित्र्य संपन्न असा महाराष्ट्रातील हा नेता होता. आमच्या घरात सुद्धा शेतकरी कामगार पक्ष होता. त्यानिमित्ताने अनेक नेत्यांची आमच्या घरात वर्दळ असायची. त्यात गणपतराव देशमुख यांचाही समावेश होता. वडील बंधू आप्पासाहेब यांच्याशी गणपतराव यांचे चांगले स्नेहसंबंध होते, असं पवार म्हणाले.




गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पाणावलेल्या डोळ्यांनी हजारो कष्टकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप


शरद पवार म्हणाले की,  महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना संदर्भातले चिंता नेहमी गणपतराव व्यक्त करायचे. दुष्काळी सांगोला मधून सुरू झालेली रोजगार हमी योजना. या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे योजना केंद्र सरकारने सुद्धा घेतली आहे असे पवार यांनी सांगितले.


BLOG | गणपत आबा... राजकारणातील 'भीष्म पितामह' गमावला!