पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची वर्णी लागली आहे. पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. शरद पवार यांच्या पुण्यातील मोती बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर पुण्यात जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.

बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी सभेला बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागरही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या त्यांनी घेतलेल्या भेटींनी या चर्चांना अधिकच जोर चढला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या चार खासदारांपैकी तीन खासदार बैठकीला उपस्थित होते. मात्र साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित होते.