अहमदनगर : अहमदनगरमधल्या गोळीबाराचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. जामखेडमध्ये गोळीबार करुन योगेश आणि राकेश राळेभात या भावांची हत्या करण्यात आली आहे. योगेश राळेभात हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेचा जिल्हा सरचिटणीस होता.


एका महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कडेगावमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता जामखेडमध्ये अज्ञातांनी दोघांवर गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

गोळीबारात 30 वर्षीय योगेश आणि 25 वर्षीय राकेश राळेभात यांचा मृत्यू झाला. मार्केट यार्ड परिसरात आज (शनिवारी) संध्याकाळी पावणेसात वाजता दुचाकीवरील अज्ञात दोघांनी गोळीबार केला. दोघांनीही तोंडाला कापड गुंडाळल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही.

गोळीबारानंतर दोघे आरोपी फरार झाले आहेत. गोळीबारानंतर नागरिक सैरावैरा पळाल्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबाराचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

दरम्यान, अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाले असून जमाव संतप्त झाला आहे.