Wardha News वर्धा : वर्धा (Wardha News) जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार या एका सुखद धक्क्याने वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आशा पल्लवीत झाल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे, यासाठी महाविद्यालय संघर्ष समितीने अनेक महिने संघर्ष केला. अखेर या संघर्षात संघर्ष समितीचा विजय झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Government Medical College)  बांधकामाच्या जागेवरून आता हिंगणघाट येथे वादंग सुरू झाले आहे. हिंगणघाट (Hinganghat) शहरात 61 एकर शासकीय जागा उपलब्ध असताना हिंगणघाटपासून पाच किलोमीटर अंतरावर वेळा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का उभारले जात आहे? वैद्यकीय महाविद्यालयाची ही जागा नेमकी कुणाची? काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाविद्यालयाचा डोलारा हा वेळा येथे उभारला जातो का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले (Atul Wandile) यांनी हिंगणघाट येथे पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला आहे.  


दानातल्या जमिनीवर वैद्यकीय महाविद्यालयाचा डोलारा?


मल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीला वेळा येथील शेकडो एकर  जागा मिळाली आहे. सुमारे अडीचशे एकर क्षेत्रात असलेल्या या जागेवर कित्येक वर्षे बापूराव देशमुख सहकारी साखर कारखाना  हा प्रकल्प उभा होता. या साखर कारखान्यामधून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या उसाला न्याय मिळत राहिला. कालांतराने हा कारखाना अवसायनात निघाला. सहकार क्षेत्रातील या धक्कादायक घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकरी या भागात कमी झाला. आता सरकारकडून जिल्हा सहकारी बँकेकडून या जागेचा लिलाव करण्यात आला. मल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही जागा विकण्यात आली. काही दिवसांपूर्वी विकण्यात आलेल्या या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी व्हावी, असा घाट काही राजकीय लोकप्रतिनिधींनी मांडला असल्याचा आरोप अतुल वांदिले यांच्याकडून करण्यात आलाय.


संघर्ष समितीने तब्बल 208 दिवस आंदोलन करत संघर्ष केला. महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. पण या महाविद्यालयाच्या आड राजकारण होत असल्याचा आरोप आता व्हायला लागला आहे. हिंगणघाट येथील आमदार समीर कुणावर यांचा या जागा वितरणात हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.


काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा राजकीय डाव


वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहर हे नागपूर - हैदराबाद आणि नागपूर - चंद्रपूर या मार्गाला जोडले गेले आहे. अत्यंत महत्त्वाचे शहर समजले जाणाऱ्या या हिंगणघाटमध्ये विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अशात वर्धा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात येणे ही हिंगणघाट शहरातील नागरिकांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे. असे असताना शहरात शासकीय रुग्णालयाच्या मागच्या बाजूला 61 एकर इतकी जागा उपलब्ध आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमानुसार अत्यावश्यक असणारी जागा शहरातच उपलब्ध असताना शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर हे महाविद्यालय कोणाच्या फायद्यासाठी हलविले जाते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अतुल वांदिले यांनी एक ना अनेक आरोप करत भारतीय जनता पक्षाचे आमदार काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी हा राजकीय डाव मांडत असल्याचा आरोप केला आहे.


समीर कुणावर हे या उद्योगपतींचे भागीदार आहेत का?


वेळा येथील साखर कारखान्याच्या सभोवताल वेगवेगळ्या मोठ्या उद्योजकांची जागा आहे. महाविद्यालय येथे गेले तर भविष्यात या जागेच्या किमती वाढतील आणि अमाप पैसा कमावता येईल, असाच हेतू या राजकीय डावामागे असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय खुद्द आमदार समीर कुणावर हे या उद्योगपतींचे भागीदार आहेत का? ज्या मल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही जागा आहे ती मल कंपनी तब्बल 38 एकर जागा अचानक एकाएकी शासनाला दान म्हणून का देऊ पाहते. जिल्हाधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि काही महसूलच्या अधिकाऱ्यांचा यात रस आहे का? असाही सवाल उपस्थित करण्यात आला.


वैद्यकीय सचिवांना पाठविलेल्या पत्रात या जागेबद्दलच्या निश्चितीसाठीचा अहवाल महसूल विभागाकडून आरोग्य विभागाला पाठविण्यात आला आहे. आणि हेच गोपनीय पत्र सध्या विरोधकांच्या हाती लागले आहे. जमीन बळकावण्यासाठी आणि जमिनीचा भाव वाढविण्यासाठीचा हा राजकीय डाव असल्याचे अतुल वांदिले यांनी यावेळी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या