Bhandara News भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एक विचित्र अपघाताची (Accident) बातमी समोर आली आहे. यात अपघातात भरधाव कार अनियंत्रित झाल्याने आई आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रायपूरकडून नागपूरच्या दिशेनं जाणारी भरधाव चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ती डिवायडरवर आदळली. या भीषण अपघातात कार महामार्गावर विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात कारमधील वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू झालाय. तर, 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना रायपूर - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Raipur Nagpur National Highway) साकोली येथील उड्डाण पुलावर सायंकाळच्या सुमारास घडली.
कांता गजभिये (वय 72 वर्ष) आणि डॉ. सुफलकुमार गजभिये (वय 57 वर्ष ) असं या अपघातात मृत पावलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर, शिवान गजभिये (वय 16 वर्ष) असं जखमी मुलाचं नावं असून त्याच्यावर साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघाताच्या घटनेत माय लेकाचा जीव गेल्याने गजभिये कुटुंबियासह परिसरात शोककळा पसरली आहे.
भरधाव कार उलटल्याने वृद्ध आईसह मुलाचा दुर्देवी मृत्यू
रायपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर सफलकुमार गजभिये यांच्या नातेसंबंधातील विवाह समारंभ नागपूर इथं असल्यानं ते आई आणि त्यांचा मुलगा शिवान यांच्यासह कारने (कार क्रमांक सी जी 04 एच जे 4484) रायपूर इथून नागपूरकडं निघाले होते. दरम्यान, भरधाव कार नागपूरकडे निघाली असताना भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर आली असता, कार अनियंत्रित झाली आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ती डिवायडरवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारमधील वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू झालाय. सध्या या घटनेचा अधिक तपास साकोली पोलीस करीत आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
वनक्षेत्रातून मानवी वस्तीकडं आलेला बिबट राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनानं त्याला जबर धडक दिली. या धडकेत बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. ही घटना आज रविवारच्या पहाटेच्या सुमारास समोर आली. मृत बिबट हा नर असून तो तीन वर्ष वयाचा असल्याचा अंदाज वन विभागानं व्यक्त केला आहे. साकोलीचे DYSP सुशांत सिंग हे गस्तीवर असताना त्यांना बिबट मृतावस्थेत आढळून आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती होताच जांभळी येथील वन विभागाच्या नर्सरीत मृत बिबटवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यात आलं.
इतर महत्वाच्या बातम्या