तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्ष टिकेल : शरद पवार
17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र पवारांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे समोर आले आहे.
राज्यात सत्ता स्थापनेसाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पूर्ण 5 वर्ष चालेल. तसेच तिन्ही पक्षाचे हे सरकार 5 वर्ष चालावे यावर आमची नजर राहील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता.
शरद पवार हे गुरुवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते विविध ठिकाणी बांधावर गेले होते. शिवसेनेच्या कडवट हिंदुत्व संदर्भातल्या प्रश्नावर शरद पवारानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासाठी धर्मनिरपेक्षता नेहमीच महत्त्वाची असून सरकार चालवताना आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता हा महत्वाचा मुद्दा असेल असे उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे या प्रश्नावर स्पष्ट नकार देत पवार म्हणाले, आमची चर्चा फक्त काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे, असेही पवार म्हणाले होते.
राज्यात भाजपशिवाय दुसरे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मात्र पवारांनी खोचकपणे उत्तर दिले. पवार म्हणाले की, बरं झाले त्यांनी ( फडणवीस ) हे सांगितले नाही तर माझ्या डोक्यात फडणवीसांचे 'मी पुन्हा येईन' हेच एकमेव विधान होते. फडणवीसांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मात्र, ते भविष्य ही चांगले ओळखतात हे माहीत नव्हतं, असा टोलाही त्यांनी लगावला होता.