मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी जनतेनं दिलेला कौल बाजूला ठेवल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ ओढवलीय. मात्र नेत्यांच्या या राजकारणात मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला आज तर चक्क टाळे लागलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गरजू लोकांना आजही मदतीशिवाय परतावं लागत आहे. गुरुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या दरवाजावर आणि बाजूला असलेले नियम आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे बोर्ड लावले होते. पण आज तेही काढून टाकण्यात आले आहेत. ज्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून राज्यातील हजारो रुग्णांना आजवर मोठी मदत झाली. त्या कक्षाचं हे दार आज बंद करण्यात आलं आहे.

दरम्यान राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आल्याने 5 हजार 657 रुग्णांचा जीव टांगणीला, अशा प्रकारची बातमी एबीपी माझाने प्रसारीत केली होती. या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पत्र दिलं. शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला. तर, आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना जाऊन भेटले. परिणामी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक आता काढण्यात आला आहे.

Presidents Rule | राष्ट्रपती राजवटीचा शेतकऱ्यांना फटका, सरकार नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित | ABP Majha



राज्यात सर्व पक्ष सत्तास्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे रुग्णांच्या मदतीसाठीचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आला होता. त्यामुळं राज्यातील 5 हजार 657 रुग्ण मृत्यूच्या छायेत असल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारीत केली होती. या बातमीनंतर राजकीय नेत्यांना जाग आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तात्काळ चालू करावा या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पत्र दिलं आहे. तर आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली.

मुख्यमंत्री सहायत्ता निधी कक्षाचं काम?

हृदय रोग, कर्करोग, यकृत, मोठा अपघात अशा अनेक आजारांवर या कक्षाकडून उपयुक्त मदत केली जाते.

देवेंद्र फडणवीसांच्या काळात या कक्षाद्वारे राज्यातील 21 लाख रुग्णांना तब्बल 1 हजार 600 कोटीहून जास्त आर्थिक सहाय्य मिळालं.