मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पूर्ण 5 वर्ष चालेल. तसेच तिन्ही पक्षाचे हे सरकार 5 वर्ष चालावे यावर आमची नजर राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मध्यावधी निवडणुकांची शंका ही त्यांनी फेटाळून लावली.


शरद पवार हे गुरुवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते विविध ठिकाणी बांधावर गेले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, तिन्ही पक्षांच्या एकत्रित सरकार मध्ये मुख्यमंत्री कोण राहील? या प्रश्नाला बगल देत पवारांनी सध्या चर्चा प्राथमिक स्तरावर असून कोणाची मागणी आल्यास त्याचा विचार करू, सर्व पत्ते आम्ही आजच का खुले करावे. सध्या आमची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये कोणत्या वेळी कोणता मुद्दा घ्यायचा हे आम्ही निश्चित करू असे उत्तर त्यांनी दिले.

शिवसेनेच्या कडवट हिंदुत्व संदर्भातल्या प्रश्नावर शरद पवारानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासाठी धर्मनिरपेक्षता नेहमीच महत्त्वाची असून सरकार चालवताना आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता हा महत्वाचा मुद्दा असेल असे उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे या प्रश्नावर स्पष्ट नकार देत पवार म्हणाले, आमची चर्चा फक्त काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सुरु आहे.

राज्यात भाजपशिवाय दुसरे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर मात्र पवारांनी खोचकपणे उत्तर दिले. पवार म्हणाले की, बरं झाले त्यांनी ( फडणवीस ) हे सांगितले नाही तर माझ्या डोक्यात फडणवीसांचे 'मी पुन्हा येईन' हेच एकमेव विधान होते. फडणवीसांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मात्र, ते भविष्य ही चांगले ओळखतात हे माहीत नव्हतं.

Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस ज्योतिषी होते हे माहित नव्हतं, मी पुन्हा येईन वरुन पवारांचा टोला | ABP Majha


 

नितीन गडकरी यांच्या राजकारण आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे या विधानाचा समाचार पवार यांनी त्यांच्या खास शैलीत घेतला. मी क्रिकेटमध्ये खेळाडू नव्हे तर प्रशासक आहे असे पवार म्हणाले. मात्र, त्याच प्रश्नावर पुढे बोलताना पवारांनी महाराष्ट्रात स्थिर, विकासाभिमुख सरकार देण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व काही करण्याची आमची सर्वांची मनापासूनची इच्छा असल्याचे सूचक वक्तव्य पवारांनी केले. मुस्लिम आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात तिन्ही पक्षांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम मध्ये निर्णय होईल. एकदा ते तयार झाले तेव्हाच पुढचा मार्ग निश्चित होईल असे पवार म्हणाले.

नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासन किमान 33 टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरच नुकसानीचे पंचनामे करत आहे, हे चूक असून प्रशासनाने सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना या वर्षी झालेल्या नुकसानी संदर्भात आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना या पुढे बिनव्याजी किंवा अत्यल्प व्याजावर कर्ज देणे शक्य होईल का? या संदर्भात केंद्रीय कृषी विभाग आणि अर्थ विभागाशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीच्या प्रश्नावर गरज पडल्यास पंतप्रधानांची भेट घेऊ असेही पवार म्हणाले.