Sharad Pawar: अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे, त्यामुळे मला कुणी भेटायला आलं किंवा मी कुणाला भेटायला बोलावलं, हा चर्चेचा विषय बनू शकत नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही - शरद पवार
राष्ट्रवादी पक्ष कधीच भाजपसोबत जाणार नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवारांनी दिलं आहे. राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपसोबत जाणार नसल्याचं यावेळी शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरणार पुढील रणनीती
पुढील रणनीती ठरवण्यासाठी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आल्याचं शरद पवारांनी सांगितलं. मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये 1 सप्टेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, यात पुढील रणनीतीविषयी चर्चा होणार असल्याचं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक होणार आहे. 35 ते 40 नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले.
सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर - शरद पवार
विरोधकांच्या इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे, सामान्य जनतेला हे आवडत नसून त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, असं देखील शरद पवार म्हणाले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना नोटिसा पाठवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचं शरद पवार म्हणाले. जनता लवकरच महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देईल, असंही शरद पवार म्हणाले.
देशाच्या दृष्टीने मणिपूरचा प्रश्न महत्त्वाचा - शरद पवार
मणिपूरचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. संसदेतील भाषणात पंतप्रधानांनी त्यावर भाष्य केलं, परंतु जनतेच्या मुद्द्यांकडे, राष्ट्रीय प्रश्नांकडे सहनशीलतेनं पाहिले जात नसल्याचं शरद पवार म्हणाले. राज्यांचे प्रश्न गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याचं पवार म्हणाले. सीमा भागातील समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
हेही वाचा:
Sanjay Shirsat : भाजप-शिवसेना युती कशी तुटली?; शिरसाट यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट