Gulabrao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सत्तेत प्रवेश केल्यानंतर आमच्यावर झालेले खोक्याचे आरोप बंद झाले. नाहीतर आम्ही आयुष्यभर खोके खोके, 50 कोटी हेच एकलं असतं असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केलं. सत्तेत आता आम्ही तीन पार्टनर झालो आहोत. बाळसाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या पदावर पोहोचवल्याचेही पाटील म्हणाले. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nandurbar Agricultural Produce Market Committee) व्यापारी संकुल आणि यासह विविध संस्थांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काल काही तरी इलू इलू
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर देखील गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काल काही तरी इलू इलू झालं असल्याचे पाटील म्हणाले. मंत्रीपदासाठी शिवलेल्या कोटवर देखील पाटील यांनी वक्तव्य केल्यानं उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने आमच्यावर झालेल्या खोक्यांच्या आरोपांपासून आम्ही मुक्त झाल्याचे पाटील म्हणाले. तर दुसरीकडं राज्यात अलीकडे झालेला शपथविधी हा सकाळ, संध्याकाळ आणि दुपार या तिन्ही वेळ पूर्ण झाल्याचा टोला मारत त्यांनी राजकीय भाष्य केले.
आता अनेकांनी कोट टांगून ठेवलेत
मी पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळेस कोट शिवला होता. मात्र आता अनेकांनी कोट टांगून ठेवले असल्याचा टोला मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांना गुलाबराव पाटील यांनी मारला. आज झालेल्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंचं बंड
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केले. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर '50 खोके एकदम ओके' या घोषणेची सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रुपये घेऊन बंड केलं असा आरोप सातत्याने करत आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदार बेचैन झालेत. उद्धव ठाकरेंनी तर शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिंदे गटातील आमदारांचा 'खोकासूर' म्हणून उल्लेखही केला होता.
अजित पवारांचे बंड
दरम्यान, मागील महिन्यात अजित पवारांनी बंड करुन ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांसह नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या खेळीमुळे राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलली. अजित पवारांच्या बंडाचा काहींना फायदा झाला, तर काहींची धाकधूक वाढली. शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: