नागपूर : शरद पवार आणि नितीन गडकरी जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी दोघांमधला एकमेकांबद्दलचा स्नेह कोणापासून लपलेला नाही. दोघेही अनेक वेळा एकमेकांची पाठराखण करतानाही दिसतात. तसेच चित्र आज शरद पवार नागपूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असताना दिसून आला. शरद पवार कुही तालुक्यात पाहणी करत असताना त्यांना शेतात उसाचे पीक दिसले. शरद पवारांनी लगेच शेतातून ऊस बोलावून त्याची प्रत तपासली. तेवढ्यात शेतकरी पवारांच्या गाडीभोवती जमले. तेव्हा शरद पवार यांनी उसाचे पैसे कारखान्यातून मिळतात की नाही अशी विचारणा केली.


शेतकऱ्यांनी उसाचे पैसे मिळण्यात अनेक अडचणी असून सहा सहा महिने ऊसाचे पैसे मिळत नाही अशी व्यथा व्यक्त केली. तेव्हा शरद पवारांनी ऊसाचे पैसे शेतकऱ्याकडून ऊस घेतल्याच्या 14 दिवसात मिळालेच पाहिजे असे नियम असल्याचे सांगितले. तेवढ्यात एका शेतकऱ्याने परिसरातला ऊस नितीन गडकरी यांच्याशी संबंधित पूर्ती साखर कारखान्यात जात असल्याचे सांगितले. पवार यांना संबंधित कारखाने गडकरी कुटुंबाशी संबंधित असल्याचे लक्षात आले. आणि पवारांनी लगेच विषय बदलत शेतकऱ्यांना इतर पिकाबद्दल विचारणे सुरू केले. त्यामुळे शेतीतल्या हानीची पाहणी करताना नितीन गडकरी यांच्यासोबतच्या संबंधाचा गोडवा कमी होऊ नये याची काळजी शरद पवार यांनी घेतली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

पावसाच्या नुकसानीचा शरद पवारांकडून आढावा, विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा दिला
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नागपूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेतला. सकाळी 10 वाजता नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर शरद पवार थेट काटोलच्या दिशेने निघाले. सर्वप्रथम ते काटोजवळील चारगाव येथील शेतकरी रवी पुनवटकर यांच्या नुकसानग्रस्त शेतावर पोहचले. त्या ठिकाणी त्यांनी अतिवृष्टीत वाया गेलेल्या कापसाच्या पिकांची शरद पवारांनी पाहणी केली.

तिथून पवार यांनी हातला गावातील भय्याजी फिस्के यांच्या शेतीचा परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर काटोल बायपास येथील विक्रम वानखेडे यांच्या संत्र्यांच्या बगीच्यात ते पोहचले. पवारांनी तेथील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. तिथे पवारांसमोरच शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला. तसेच संत्रा बाग खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी यंदा संत्र्यांचा दर्जा कमी झाल्यामुळे कसे सौदे रद्द केले हे पवार यांच्या लक्षात आणून दिले.

त्यानंतर काटोलजवळील खानगाव येथील रवी टेंभे आणि नायगाव ठाकरे येथील प्रदीप ठाकरे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पवार पोहोचले. तिथेही पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली.