तिथून पवार यांनी हातला गावातील भय्याजी फिस्के यांच्या शेतीचा परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर काटोल बायपास येथील विक्रम वानखेडे यांच्या संत्र्यांच्या बगीच्यात ते पोहोचले. या ठिकाणी शरद पवारांनी तेथील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. तिथे पवारांसमोरच शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला. तसेच संत्रा बाग खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी यंदा संत्र्यांचा दर्जा कमी झाल्यामुळे कसे सौदे रद्द केले हे पवार यांच्या लक्षात आणून दिले.
त्यानंतर काटोलजवळील खानगाव येथील रवी टेंभे आणि नायगाव ठाकरे येथील प्रदीप ठाकरे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पवार पोहोचले. तिथेही पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. भारसिंगी गावातून खापाकडे शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना जामगाव जवळ एक बाईक स्वार त्यांच्या ताफ्यात शिरला अचानक ताफ्यातील गाड्यांनी ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र बाईक स्वार थोडीशी धडक बसल्याने खाली पडून जखमी झाला. त्याला लगेच ताफ्यातील एम्बुलेन्समध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले गेले. दरम्यान तो बाईक स्वार मद्य प्राशन करून असल्याचेही समोर आले आहे.