मुंबई: राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता दोन गट तयार झाले असताना आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि शरद पवारांसाठी महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी, 45 वर्षांपूर्वी, 18 जुलै 1878 रोजी शरद पवारांनी वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ (Sharad Pawar First Time CM) घेतली होती. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री (Youngest CM Of Maharashtra ) बनले आणि आतापर्यंत त्यांचा हा विक्रम कुणीही मोडू शकला नाही. 


शरद पवारांनी 1978 साली पुलोदचा प्रयोग केला आणि नवी आघाडी करत सत्तास्थापनेचा दावा केला. शरद पवारांना त्यावेळी अनेक आमदारांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. सादिक अली हे महात्मा गांधी यांचे अनुयायी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. 


 






राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार हे सध्या 83 वर्षाचे असून ते देशभरातील भाजप विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आहेत. आजही शरद पवारांचा एखादा शब्द सत्ताधारी असोत वा विरोधक, डावलू शकत नाही आणि हीच त्यांची ताकद आहे. सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे राजकारणापलिकडचे नाते आजही अनेकांना आश्चर्यचकीत करते. 


शरद पवारांनी आपल्या राजकारणाची आणि समाजकारणाची सुरूवात ही 1956 साली महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना केली. युवक काँग्रेसचे काम करताना त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं आणि 1967 साली वयाच्या 27 व्या वर्षी ते आमदार झाले. तेव्हापासूनचा त्यांचा राजकारणाचा प्रवास हा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंत झाला. शरद पवारांनी केंद्रात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. त्यामध्ये संरक्षणमंत्री असताना आणि कृषीमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाचा आजही दाखला दिला जातो. 


 






Sharad Pawar First Time CM : काय होता शरद पवारांचा पुलोद प्रयोग?


राज्यात त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँगेसचे सरकार सत्तेत होतं. शरद पवारही त्या सरकारचा एक भाग होते. पण शरद पवारांनी त्यातील 40 आमदारांना सोबत घेतलं आणि पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचा प्रयोग (Sharad Pawar Pulod Sarkar)केला. पुलोद हा राज्यातील पहिला आघाडी सरकारचा प्रयोग होता. 


सन 1975 साली देशात आणीबाणी (Emergency In Maharashtra) लागली आणि सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्र काँग्रेसला त्याचा फटका बसला आणि राज्यात केवळ 20 खासदार निवडून आले. त्यानंतर वसंतदादा पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. 


आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी ब्रह्मानंद रेड्डी यांच्यासोबत रेड्डी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. महाराष्ट्रातली त्याचा परिणाम झाला आणि वसंतदादा पाटील आणि शरद पवार त्या गटासोबत गेले. 1978 साली राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाला 99 जागा मिळाल्या तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा आणि इंदिरा काँग्रेसला 62 जागा मिळाल्या. त्यावेळी रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्रित आले आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. 


नाशिकराव तिरपुडे हे या सरकारचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सरकारमध्ये मोठा हस्तक्षेप सुरू केला. परिणामी दोन्ही काँग्रेसला सरकार चालवणे अवघड झाले. अशा वेळी शरद पवारांनी त्यांच्या 40 आमदारांसह सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि त्यांनी जनता पक्षासोबत हातमिळवणी केली.


शरद पवार सरकारमधून बाहेर पडल्यानंतर वसंतदादा सरकार अल्पमतात आलं आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष या बिगर काँग्रेस पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. सोबत येतील ते सर्व मित्रपक्षांना घेऊन शरद पवारांनी राज्यात पुलोदचा पहिला प्रयोग यशस्वी केला आणि 18 जुलै 1978 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.