Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज म्हणजे 12 डिसेंबरला 81 वा वाढदिवस आहे. शरद पवार आणि महाराष्ट्राचं राजकारण हे जणू एक समीकरणच बनले आहे. त्यांनी 4 वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. केंद्रीय मंत्रिमंडळातील कारभारही त्यांनी चोख बजावला. पवारांनी त्यांच्या भाषणाने अनेक सभा आणि मेळावे गाजवले. याचे ताजे उदाहरण म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांचं पावसातील भाषण. हे भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांचे मोठं योगदान आहे. 


राज्यभरात शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सोहळे सुरु झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी लेखक, पत्रकार सुधीर भोंगळे यांच्या 'नेमकचि बोलणे' पुस्तकाचं प्रकाशन झालं. शरद पवारांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तक प्रकाशनावेळी पवारांचे काही भन्नाट किस्सेही समोर आले आहेत.


शरद पवारांनी चालवला सुसाट टेम्पो
अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांनी टेम्पो चालवल्याचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. भोंगळेंनी सांगितलं की, एक दिवस पेरणे वाल्हे गोलाई परिसरात गारपीट झाली. तिथं मोठं नुकसान झालं होतं. भोंगळे यांनी सांगितले की, आपण पवारांसोबत घटना घडलेल्या ठिकाणी जायला निघालो. तिथे काही कारणानं पवारांची गाडी जात नव्हती. मात्र एक 16 सीटरचा टेम्पो जात होता. मग आम्ही त्या टेम्पोनं जायचं ठरवलं. स्वत: शरद पवारांनी टेम्पो चालवायला घेतला. इतक्या जोरात पवार साहेब टेम्पो चालवत होते की धडाधड टेम्पो उडत होता. आणि आमचं डोकं टपाला आदळत होतं. मी पवार साहेबांना म्हटलं की, अहो गाडी चालवताय का विमान चालवताय. तर ते म्हणाले की, पवारांना असल्या गाड्या हळू हळू चालवायला जमतच नाही. ते राज्य देखील असंच धडाक्यानं चालवत आले आहेत. महाविकास आघाडीची गाडी देखील ते अशीच चालवत आहेत आणि भविष्यातही चालवत राहतील, असं भोंगळे म्हणाले. हा किस्सा ऐकत असताना शरद पवार यांनी देखील हसून दाद दिली.


नावं लक्षात ठेवण्याचा भन्नाट किस्सा
कवी किशोर कदम यांनी पवारांना एकदा प्रश्न विचारला की, ''आम्ही नट असून पाठांतरात कमी पडतो, तुम्ही नावं कशी लक्षात ठेवता?'' त्यावर शरद पवांनी भन्नाट गोष्ट सांगितली. शरद पवार म्हणाले, "राजकारणात फार कमी कष्टानं आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळतं, फक्त तुम्ही समोरच्या माणसाचं नाव लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातली होती. तिचं काहीतरी काम होतं. मी तिला म्हटलं, काय गं कुसूम मुंबईला कशी, काय चाललंय? तर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली काम होवो न होवो, अशी तिची भावना होती. लोकांचं खूप छोट्या गोष्टीत सुख असतं. या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत.'' या गुणामुळं समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त व्हायचं यश मिळतं, असंही पवार म्हणाले.


पवारांच्या हुशारीमुळे हेलिकॉप्टर अपघात टळला
पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला की, ''मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो. त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. वाऱ्याचा वेगही जास्त होता. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं. आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे मी सांगितले, महाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वांत उंच शिखर आहे. ते 5 हजार फुटांच्यावर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण 7 हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो.'



संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha