Shantabai Kamble Passes Away : मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कांबळे (Shantabai Kamble) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. दलित पॅंथरचे नेते दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.
शांताबाई यांच्या पश्चायात मुले, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला होता. त्यांच्यावर आज कोपखैराणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
शांताबाई कांबळे यांचा जन्म 1 मार्च 1923 रोजी सांगलीत झाला. सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. 16 जानेवारी 1942 रोजी त्यांची सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात नियुक्ती झाली होती. त्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या होत्या. काही दिवस त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकार म्हणून काम केले होते.
शांताबाई कांबळे या 28 फेब्रुवारी 1981 रोजी सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी वाङ्मयातील दलित स्त्रीचे पहिलेच आत्मकथन त्यांनी लिहिले. 'नाजुका' या नावाने मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात 10 ऑगस्ट 1990 पासून हे आत्माकथन सादर झाले. फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले. 'फेमिना' मासिकाच्या काही अंकांतून इंग्रजीत अनुवादित झाले. शांताबाई कांबळे यांचं 'माज्या जल्माची चित्तरकथा' हे आत्मवृत्त विशेष गाजलं होतं.
शांताबाई कांबळे या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 'माज्या जल्माची चित्तरकथा' या पुस्तकावर आधारित 'नाजुका' या नावाने एक दूरचित्रवाणी मालिका होती. शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे.
संबंधित बातम्या