Prakash Ambedkar on Sharad Pawar: ''शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत'', असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. ही युती ऐतिहासिक आहे का? सध्याच्या राजकारणात भाजपाला हरवण्यासाठी विरोधकांची एकी कशी महत्वाची आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. यातच आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शरद पवार हे भाजप सोबत असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या बातमीचा दाखला देत म्हटले की, एका वृत्तपत्रात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, मला (अजित पवार यांना) का लोक दोष देतात? हे तर आमच्या पक्षाचं ठरलं होत. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभे आधीच आमचं ठरलं होत, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Prakash Ambedkar on Sharad Pawar: '...तर ठाकरे सरकार पडलं नसतं'
यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवार यांनी भाजपविरुद्ध सर्व विरोध पक्षांना एक करण्याचा प्रयत्न केला. यावर ते म्हणाले की, चंद्रशेखर (तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ) यांनी ही प्रयोग केला, त्याच्या शरद पवार नव्हते. आताच्या असलेल्या प्रयोगात शिवसेनेला भाजपला सोडून बाहेर पडायचं होत. मी त्यावेळीही म्हणालो आजही म्हणतो, सेनेने काही तरी करून ती सत्ता आपल्या हातात ठेवून जर ते चाले असते, तर सरकार पडलं नसतं. ते म्हणाले, सत्तेची गरज ही काँग्रेस-राष्ट्रवादीला होती, शिवसेनेला नाही.
Prakash Ambedkar on Sharad Pawar: 'ते वकीलपत्र आम्ही उद्धव ठाकरे यांना दिलं'
सेनेची वंचितसोबत युती झाली मात्र भविष्यात त्यांची महाविकास आघाडीसोबत युती होणार नाही का? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, ते मी नाही सांगू शकता, ते उद्धव ठाकरे हेच सांगू शकतील. कारण त्यांनी जबाबदारी घेतली आहे की, या युतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणायचं किंवा मला मविआमध्ये घेऊन ज्याचं, ते वकीलपत्र आम्ही उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.