पंढरपूर:  शाकंबरी पौर्णिमा (Shakambhari Purnima) हिंदू धर्मातील तसा नेहमीच एक सण मात्र ज्या घरात हा सण साजरा होतो त्या घरातील महिलांना या दोन दिवसात अनेक दिव्यातून जावे लागते. शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्याची देवी मानली  जाते. आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने , फुले , फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते. या देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते.


 या हंगामात पिकणाऱ्या किमान 60 प्रकारच्या भाज्याचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हा भोग देखील सूर्योदयापूर्वी म्हणजे माशी उठण्यापूर्वी देवीला दाखवावा लागतो.  यासाठी आदल्या दिवशी या 60 प्रकारच्या फळ व पालेभाज्या गोळा करताना माणूस दमून जातो . मेथी , पालक , शेपू , तांदूळसा , भेंडी , गवार , कारले , वांगे , बटाटा , कोबी , फ्लॉवर अशा ठराविक भाज्या आपणास माहित असतात.  मात्र अगदी सराटी , घोळ , चिघळ , कुर्डू , केळफूल , कडवंची , हदगाचिंचेचा चिगोरफूल , चंद्र नवखा , देवडांगरं अशा किती तरी प्रकारच्या रानभाज्या मंडईमधून आणाव्या लागतात. खरी कमाल या भाज्या विकणाऱ्याची असते. कारण हा भाजीवाला पठ्ठया 60 लागतात तर 88 प्रकारच्या भाज्या आणून ठेवतो. 


यासाठी त्याला कर्नाटक, कोकण , मराठवाडा , विदर्भ अशा विविध भागातून या भाज्या जमावाव्या लागतात. आज किसान देवमारे या भाजी विक्रेत्याने तब्बल 88 प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी आणल्या असून यात 45  प्रकारच्या पालेभाज्या आणि 43 प्रकारच्या फळभाज्यांच्या समावेश आहे . देवमारे कुटुंबाची ही पाचवी पिढी शाकंबरी देवीसाठी भाज्या विक्रीचे काम करत असते. सर्वसाधारणपणे या 60 भाज्यांची किंमत यंदा 1100 रुपये एवढी झाली आहे . 


यानंतर महिला या 60 प्रकारच्या भाज्या एकत्रित बनवून सोबत जवळपास 26 प्रकारचे इतर पदार्थ ताटात ठेवून हा महानैवेद्य शाकंभरीला दाखवतात. यासाठी रात्री एक  वाजता स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते. सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे साडेपाच वाजता हा महानैवेद्य अर्थात 86 प्रकारच्या पदार्थांचा भोग देवीला दाखवावा लागतो. ब्राह्मण , कोष्टी , लिंगायत , सोनार अशा अनेक समाजामध्ये हे देवीचे नवरात्र उत्सव साजरा होतो. पंढरपूरमधील भिंगे , परिचारक , भालवणकर, पुजारी यांच्यासह शेकडो घरात या प्रथा पाळण्यात येतात. या देवीचे मुख्य ठाण कर्नाटक येथील बदामी येथे असून हिचे दुसरे ठाण पंढरपूर तालुक्यातील भाळवणी तर तिसरे ठाणं जात तालुक्यातील बनाळी येथे आहे . अकलूज येथील ग्रामदैवत असणाऱ्या अकलाई मंदिरातही अशाच पद्धतीने 60 प्रकारच्या भाज्यांनी  मंदिर सजवून देवीला महानैवेद्य दाखविला जातो


अर्थात या प्रथा शेकडो वर्षांपासून जरी चालत आल्या असल्या तरी महाराष्ट्रातील अनेक घरात या पाळल्या जातात. या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यामागचा उद्देश असतो. राज्यभरातील अनेक मंदिरात  देवीला हा भोग लावला जातो. आपल्या प्रथा परंपरा काहीशा विचित्र वाटत असल्या तरी पूर्वीच्या लोकांनी याचा अभ्यास करूनच सुरु केल्या असाव्यात त्या आजच्या पिढीला थोड्याश्या त्रासदायक वाटत असल्या तरी आता नवीन पिढ्यानी या 60 भाज्या एकत्र करून मिक्स व्हेज करण्याची रेसिपी देखील विकसित केल्याने याचा त्रास थोडा नक्की कमी झाला आहे.