Pune Air Pollution : पुण्यात (pune) वायु प्रदूषणात (air pollution) सातत्याने वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. सफरने (SAFAR- The System of Air Quality and Weather Forecasting And Research) वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 193 होता. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदवण्यात आला आहे. सध्या पुण्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि शहरातील लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे शहरातील वातावरणावर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. पुढील काही दिवसात हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता आहे.


आकडेवारीनुसार मंगळवारी (3 जानेवारी) शिवाजीनगर, लोहेगाव, आळंदी आणि हडपसर येथे हवेची गुणवत्ता खराब होती. शिवाजीनगरने मंगळवारी पीएम 2.5 कणांचे प्रमाण 293 नोंदवले जे अत्यंत खराब श्रेणीच्या जवळ होते. मंगळवारी (3 जानेवारी) लोहेगावमध्ये एअर क्वॉलिटी इंडेक्स 249, आळंदीमध्ये एअर क्वॉलिटी इंडेक्स अत्यंत खराब श्रेणीत आणि हडपसरमध्ये एअर क्वॉलिटी इंडेक्स 306 नोंदवलं गेलं आहे.


प्रदूषित हवेसाठी वाहतूकही जबाबदार


तापमानात घट झाल्यावर प्रदूषणात ही वाढ नोंदवली जाते. जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा वातावरणातली आर्द्रता कमी असते आणि कोरडे हवामान असते. या प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात, असं सफरचे संचालक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीचे शास्त्रज्ञ बी.एस. मूर्ती यांनी सांगितलं आहे. 


पुण्यातील तापमानात घट होण्याची शक्यता


कोथरुड, वाकडमधील भूमकर चौक, निगडी, भोसरी, कात्रज आणि पाषाण या शहरातील इतर भागात मंगळवारी मध्यम ते समाधानकारक हवेची गुणवत्ता नोंदवली गेली. मंगळवारी (3 जानेवारी) पुणे शहरात रात्रीचे तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 1.7 अंश जास्त होते. तर दिवसाचे तापमान 30.8 अंश सेल्सिअस होते जे हवामान खात्यानुसार 2.1 अंश जास्त होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात येत्या काही दिवसांत दिवस आणि रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. भारताच्या वायव्य भागात अनेक ठिकाणी थंडीची लाट आधीच पसरलेली आहे. सकाळच्या वेळात पुण्यात थंडीचा कडाका जाणवत आहे आणि दुपारी मात्र उन्हाचे काही प्रमाणात चटके बसत आहे. पुढील दोन दिवसात थंडी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.