चंद्रपूर : जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना असून यामुळे जातपंचायतीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रकाश ओगले असं 58 वर्षीय मृतकाचं नाव असून काल त्यांचा मृत्यू झाला. मात्र गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे. आणि जो त्यांच्या पार्थिवाला खांदा देईल त्याला जात बहिष्कृत करण्यात येईल अशी धमकी दिल्यामुळे प्रकाश ओगले यांच्या 7 मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला.
यासंदर्भात भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना म्हटलं आहे की, 21 व्या शतकात अशा प्रकारे जात पंचायतीच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्या जात असेल तर ती चिंतेची बाब आहे, योग्य ती चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणाले.
देशातील सर्वाधिक पुरोगामी राज्य असं ओळखं असलेलं आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अशी काळिमा फासणारी घटना घडली आहे. काल या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला. मात्र काही तासातच गेल्या 15 वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला.
गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची. पदरी 7 मुली आणि 2 मुलं. त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आर्थिक दंड लावला मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला. मात्र MPSC ची तयारी करणाऱ्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लावणारा निर्णय घेतला.
गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाचाविरूद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्या मते समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडने, बहिष्कार टाकणे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसविण्याचं काम जात पंचायत करते. सध्या विदर्भात 35 कुटुंबं अशा प्रकारचा जात पंचायतीचा बहिष्कार बोगत असल्याची बाब या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणली आहे.
प्रकाश ओगले यांच्या मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देऊन आपल्या वडिलांचा आत्मसम्मान तर राखलाच पण आपल्या समाजातील तथाकथित माणसांना देखील बाटण्यापासून वाचवले. पण जात पंचायतीचं हे मढं आपला समाज किती दिवस आपल्या खांद्यावर वाहणार हा प्रश्नच आहे.