सांगली : आपल्या आवडत्या कुत्र्या वाचवताना तीन भावांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पट्टीच्या पोहणाऱ्या या तीनही भावांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दोन सख्खे आणि एका चुलत भावाचा यामध्ये समावेश आहे. आटपाडी तालुक्यात घाणंद येथे ही दु:खद घटना घडली आहे. 


वैभव व्हनमाने, विजय व्हनमाने आणि आनंदा व्हनमाने अशी बुडालेल्या तीन भावांची नावे आहेत. साखळी बंधाऱ्यात बुडालेल्या या तीन मुलांसाठीचे शोधकार्य संपले असून तिन्ही मुलांचे मृतदेह बंधाऱ्यातच सापडले आहेत. यातील दोन भावांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत पाण्यात आढळल्याचे पाहून या नातेवाईक आणि नागरिकांना आपले अश्रू अनावर झाले.  सांगलीतील विश्वकर्मा फाउंडेशन बोट क्लबचा सदस्य गजानन नरळे आणि त्याच्या टीमने पुढाकार घेत या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.


टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे. तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. तेथे लगतच अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने यांची शेत जमीन आहे. लगतच कालव्यातून पाणी वाहत जाते. नेहमीप्रमाणे काल दुपारी तीन वाजता घरातील कुत्र्याला सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय अंकुश व्हनमाने, आनंदा अंकुश  व्हनमाने आणि वैभव लहू व्हनमाने गेले होते. सायंकाळी सहा पर्यंत ते घरी परतले नाहीत. 


त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्या जवळ विजय आणि आनंदा यांचे कापडे आणि चपला सापडल्या. त्यांच्या सोबत नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात आढळला. तर वैभव याची काहीच माहिती लागली नाही. गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली. रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलांचा तपास लागला नाही. आज सकाळपासून  पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.  विश्वकर्मा फाऊंडेशन बोट क्लबचा सदस्य गजानन नरळे यांने पुढाकार घेत या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.