पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. आगीत जीवितहानी नसली तरी या आगीत बरंच नुकसान झालं आहे. याबाबत सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, घटना कळल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, त्या सर्वांचे आभार. या आगीत जीवितहानी झालेली नाही, तसंच सुदैवाने कुणीही गंभीर जखमीही झालेलं नाही. या घटनेत काही मजल्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे, असं अदर पुनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.





सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री काय म्हणाले...
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित - उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात सहभागी आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.सदर प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे,असं अजित पवार यांनी सांगितलं.


आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्डवर नाही


आग लागलेल्या इमारतीत 4 जण अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटने दिली आहे. कोविशिल्ड' लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली तिथं कोरोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत तरी कुठल्याही जिवीतहानीबद्दलची माहिती नाही. मी तातडीने घटनास्थळी रवाना होत आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.