माझा कट्टा : ज्या मुलांवर आधाराचं छत्र नाही अशा शेकडो अनाथ मुलांना आधार देणारे या मुलांची जबाबदारी घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे, शंकरबाबा पापळकर हे आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. समाजकार्यातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल संत गाडगे बाबा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. मानद पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. शंकरबाबा यांनी 15 हजार झाडांचं ‘अनाथारण्य’ अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी साकारलं आहे. शंकरबाबा पापळकर यांनी वझ्झर येथे राज्यभरातील बेवारस दिव्यांग मुलांना आश्रय दिला आहे.


मी आज भरकटलेल्या अंध, अपंग, मतिमंद बालकांचे पालकत्व स्वीकारलं आणि 123 मुलांचा बाप झालो. मला कुणी विचारत नव्हतं, कुणी माझी दखल घेत नव्हतं. अनेक बेवारस मुलांना पाहत होतो. अशा मुलांना आधार मिळावा म्हणून मी हा आश्रम सुरु केला. अनाथ आश्रमातून 18 वर्षानंतर मुलांना काढून टाकलं जातं. देशातील 18 वर्षावरील बेवारस आणि दिव्यांगांना मरेपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे. या अनाथांनासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंच लढा देऊ. या लढ्याला सर्वांना साथ द्यावी. सरकारने आर्थिक मदत करावी, असं आवाहन 80 वर्षीय शंकरबाबा यांनी सर्वांना केलं. 


काय आहे वझ्झर मॉडेल?


वझ्झर मॉडेल म्हणजे अनाथाश्रमात असलेल्या सर्व मुलांच्या वडिलांचं नाव एकच आहे. संस्थापकाचं नाव मुलांचे पालक म्हणून दिलं आहे. या मुलांचे रहिवाशी दाखले काढले आहेत, आधारकार्ड काढून घेतले आहे. त्यावर सर्वांच्या वडिलांचं नाव शंकरबाबा आहे. ग्रामपंचायत वझ्झरमधून रहिवाशी दाखला काढला आणि त्या आधारावर आधारकार्ड काढले आहे. या मुलांच्याच नावावर ही संस्था केली आहे, पैसाही ठेवला आहे. या मुलांना कार्यशाळा शिकवली आहे. मुलींना स्वंयपाकाची सवय लावली आहे. त्यामुळे माझ्यानंतरही ही संस्था चालू राहिल, असं शंकरबाबा यांनी म्हटलं. 


संत गाडगेबाबांसोबतच्या आठवणी


संत गाडगबाबे यात्रेमध्ये प्रबोधन करण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन कीर्तन करत असत. असेच ते 1954 मध्ये बहिरमच्या यात्रेत त्यांची भेट झाली. त्यावेळी मी 10-12 वर्षांचा असेल. तेथे गाडगेबाबांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, चांगल्या लोकांसोबत राहा आणि आपली पायरी सोडायची नाही. त्यानंतर 1956 मध्ये गाडगेबाबा आजारी असताना मी त्यांना भेटलो होतो. माझी आई आणि गाडगेबाबा एकाच गावचे होते. त्यामुळे त्यांना आईची विचारपूस केली आणि मला त्यांच्या जवळील एक घोंगडी दिली, अशी आठवण शंकरबाबा यांनी सांगितली.