पंढरपूर : स्वतःचे आणि आपल्या मेंढरांचे पोट भरण्यासाठी आठ महिने भटकंती करणारा मेंढपाळ समाज आता पावसाची चाहूल लागताच गावाकडे परतायला लागला आहे.  आता त्यांना कोरोना लसीची चिंता भेडसावू लागली आहे. 


राज्यातील भटकंती करणाऱ्या समाजापैकी सर्वात मोठा समाज म्हणून मेंढपाळांना ओळखले जाते. पाठीवर बिऱ्हाड अशी ओळख असलेला हा समाज ऑक्टोबरमध्ये जगण्यासाठी आपल्या मेंढ्यासह बाहेर पडतो आणि चाऱ्याच्या शोधात सुरु होते. शेकडो मैलांची पायी भटकंती... दऱ्या  खोऱ्यात आणि जंगलात मेंढ्याच्या पोटासाठी हा समाज आठ महिने भटकत असतो. घरात अठराविश्व दारिद्रय, कोणाला लहानसा जमिनीचा तुकडा असतो तर अनेक मेंढपाळ हे भूमिहीन आहेत. कायम दुष्काळी पट्ट्यात असलेल्या जमिनीत कुसळेही उगवत नसल्याने मेंढ्यांचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी पिढ्यानपिढ्या भटकंती नशिबी असते.


आठ महिन्याच्या भटकंतीनंतर आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो मेंढपाळ आपल्या कुटुंब कबिला आणि मेंढरांसह गावाकडे परतण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या कोरोनाचा धोका आता त्यांना गावात परतल्यावर होणार याची जाणीव झाल्यानेच आम्हाला लस कशी मिळणार असा प्रश्न या समाजापुढे उभा राहू लागला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात 8 महिने जंगलात गेल्याने त्यांना याचा धोका जाणवला नव्हता किंवा भीतीचीही जाणीव झाली नव्हती. आता गावात जाताना मात्र आपल्या कुटुंबातील वयस्कर आणि लहान मुलांबाबत या समाजाला काळजी वाटू लागल्याने आम्हालाही लस देण्याची मागणी केली जात आहे.


राज्यभरात दोन लाखापेक्षा जास्त मेंढपाळ कुटुंबे आता गावाकडे परंतु लागल्याने कोरोनाचे संकट आता त्यांना भेडसावू लागले आहे. संपूर्ण पावसाळ्याचा काळ आता गावात घालवायचा असल्याने ही लस घेणे गरजेचे असल्याचे या अशिक्षित कुटुंबाच्या लक्षात आले आहे. आमच्याकडे ना स्मार्ट फोन आहेत ना आम्हाला नावे नोंदवायची माहिती आहे. आता गावाकडे आल्यावर सरकारनेच आम्हाला नाव नोंदवून लस मिळवून देण्याची मागणी नकुशा पाटील ही महिला करत आहे. रानावनात लहान लहान राहुट्यातून निवारा घेत भटकंती करणाऱ्या नकुशा पाटील यांनाही कोरोनाची भीती वाटती. तीच परिस्थिती सारिका सुळे या महिलेलाही आहे. पण भटकंती केली नाही तर मेंढरांची आणि आमची पोटे कशी भरायची असा सवाल सारिका करते. 


गेले 40 वर्षे भटकंती करणाऱ्या तानाजी सुळे याना आता गावाकडे जायची ओढ लागलीय.  तशीच ओढ दादा मेटकरी यांनाही लागलीय मात्र लस देणाऱ्या आणि नाव नोंदवणाऱ्या कोणाशीच आमचा संपर्क नसल्याचे ते सांगतात. आम्ही अशिक्षित असल्याने आम्हाला लस बाबत काहीच माहित नसल्याचे संभाजी जाधव सांगतो तर जतच्या बाळू कोकरे यालाही गावाकडे गेल्यावर पहिल्यांदा लस घ्यायची आहे. मेंढपाळ समाजाची ही अडचण पाहून अहिल्यादेवी प्रबोधिनी मंच आता पुरे आला असून त्यांनी राज्यभरातील मेंढपाळ समाजाला गावात आल्यावर लस मिळवून देण्यासाठी शासनाने खास कार्यक्रम हाती घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या गरीब मेंढपाळ समाजाची कुटुंबे गावात येताच तलाठी व ग्रामसेवकांमार्फत त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करून त्यांचे लसीकरण करून घ्यावे अशी मागणी प्रबोधिनी मंचाच्या आदित्य फत्तेपूरकर यांनी केली आहे .