Selu Municipal Corporation : काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मेगा भरती झाली आहे. मागील महिन्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिल्यानंतर मालेगावमध्ये काँग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याची आज काँग्रेसने राष्ट्रवादीला परतफेड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला खिंडार पाडून महत्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. 


आज मुंबईतील टिळक भवन येथे मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादीकडे असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व 20 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तर नांदेड, औरंगाबादमधील राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांचा तसंच, भाजपच्याही कार्यकर्त्यांचाही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला आहे.


काँग्रेसकडून मालेगावची परतफेड करण्यात आली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सेलु नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व 20  नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीत पक्षप्रवेशांची चढाओढ दिसत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेतील सर्व काँग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परभणी, औरंगादाबाद, नांदेड येथे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडून आज मोठ्या संख्येनं महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज परभणीतल्या जिंतुर आणि सेलु नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 


मालेगावात राष्ट्रवादीनं दिला होता काँग्रेसला मोठा धक्का


मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या (Congress) सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला होता. मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात होतं. परंतु, आता काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या या कृत्याची परतफेड केली आहे. 


मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागा आहेत. 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून आले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागेवर विजय मिळवला होता. तर, शिवसेना 12, एमआयएम 7 आणि जनता दल सेक्युरलला 7 जागा जिंकल्या होत्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Malegaon: मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का! पक्षातील सर्व 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा