Amravti News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानं मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना भेटण्यासाठी आज त्यांच्या बंगल्यावर गेल्या होत्या. मात्र, तब्येतीचं कारण देत आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी नवनीत राणा यांची भेट नाकारली. यावेळी आयुक्तांच्या बंगल्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर मी आयुक्तांचं सांत्वन करायला आली होती. शाईफेक प्रकरणी मी त्यांच्याकडून माहिती घेणार होती. मात्र, त्यांनी माझी भेट नाकारून माझा नव्हे, तर जनतेचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी यावेळी माध्यमांना दिली.
पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक : खासदार नवनीत राणा
अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकीच्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा यांनी काल (शनिवारी) आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांनतर खासदार राणा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अटक असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांना भेटू दिलं नाही. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि खासदार राणा यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली. भेटीनंतर खासदार राणा यांनी पोलीस कोठडीत अटक असलेल्या कार्यकर्त्यांना होत असलेल्या मारहाणीची तक्रार उपयुक्तांना केल्याची माहिती दिली. तसेच राजकीय दबावाखाली आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर 307 कलमांतर्गत दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची तक्रार केंद्राकडे करणार असल्याचं सांगितलं.
राजापेठ पोलीस स्टेशनमधून खासदार राणा जिल्हा रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती असलेल्या कार्यकर्त्याला भेटायला गेल्या. मात्र सुरुवातीला तिथेही पोलिसांनी नियमांचं कारण पुढे करून त्यांना भेट नाकारली. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. खासदारांसह केवळ चार व्यक्तींनी रुग्णालयात जावं यावरून हा वाद झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून राणा यांना भेटीची परवानगी दिली. अमरावती पोलिसांनी आपला अपमान केला असून खोटे गुन्हे दाखल करणारे अधिकारी आणि आपल्याला रुग्णालयात अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलिसांना निलंबित करू, अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार नवनीत राणा यांनी या भेटीनंतर दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Amravati : शाईफेकीच्या घटनेशी माझा संबंध नाही, सुडबुद्धीने मला प्रकरणात ओढले - आमदार रवी राणा
- Amravati Ravi Rana : आमदार रवी राणांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप, नेत्यांचे राजकारण अधिकाऱ्यांचे मरण का?
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा