जालना : बोंडअळीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना राशी सिड्स कंपनीने 36 लाख 83 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. राज्यात गेल्या वर्षी झालेला नुकसानीचा अंदाज पाहता या निर्णयाने बियाणे कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.


जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या आडगावच्या शेतकऱ्यांना न्यायालयाच्या या निर्णयाने दिलासा मिळालाय. 2016 साली बोंडअळीने गावात हाहाःकार उडाला होता. गावातल्या शेकडो शेतकऱ्यांना अक्षरशः रडण्याशिवाय हातात काहीच उरलं नाही.

वर्षभरापूर्वी बोंडअळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे धाव घेतली. जिल्हा स्तरावर तक्रारीचा पाऊस पडला, जिल्हास्तर गुण नियंत्रण समितीने पंचनामा करून राज्याच्या निविष्टा आणि गुण नियंत्रकांकडे अहवाल पाठवून तक्रारी सादर केल्या आणि राज्याच्या निविष्ठा व गुण नियंत्रकांनी राशी कपनीला नुकसान भरपाईचे आदेश दिले.

हाच निकाल कायम ठेवत राज्याच्या कृषी आयुक्तांनी कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. याविरोधात राशी सिड्स कंपनीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राशी सिड्स कंपनीला याचिका दाखल करतानाच 36 लाख 83 हजार रुपये डिपॉझिट करायला लावले आणि सात ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 223 शेतकऱ्यांना भरपाई म्हणून हे पैसे वाटप करण्याचे आदेश दिले.

या आदेशाने गतवर्षी झालेल्या बोंडअळीच्या नुकसानीने 41 बीटी बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाईचे आदेश पुणे निविष्ठा आणि गुण नियंत्रणक संचालकांनी दिले आहेत. यात पहिल्या टप्प्यात 96 कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात 90 कोटी म्हणजेच 41 कंपन्यांना 186 कोटींची भरपाई देण्याचे आदेश आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जालना जिल्ह्यातील 223 शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात तक्रारीचा पाठपुरावा केला. यापैकीच एक असलेले शेतकरी आडगावचे प्रल्हाद भोंबे... गतवर्षी त्यांनी आपल्या संपूर्ण पाच एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. 5 एकर शेतात त्यांनी राशी rch-659 या वाणाची निवड केली. लागवडीसाठी त्यांनी एक लाख रुपये खर्च केले. बोंडअळीने त्यांना पाच एकरातून त्यांना 18 क्विंटल उत्पन्न झालं. त्यातील अर्धा म्हणजेच नऊ क्विंटल कापूस त्यांनी वेचणाऱ्यांना दिला. नऊ क्विंटलचे त्यांना 3500 रुपये क्विंटल बाजार भावाने फक्त 31500 रुपये मिळाले.

नुकसानीच्या बाबतीत दुर्दशेचे दशावतार भोगलेल्या अनेक शेतकऱ्यांपैकी याच गावचे ज्ञानेश्वर आडगावकर देखील होते. गतवर्षी त्यांनी 5 पैकी 4 एकरात कापूस लावला, तर एका एकरात मका केली. पाणी उपलब्ध असल्याने कपाशीवर त्यांनी 80 हजाराचा खर्च केला. मात्र यातून त्यांना केवळ 20 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं.

आडगावच्या शेकडो शेतकऱ्यांना बोंडअळीचा मोठा फटका बसला. गावात नुकसानीचा कळस झाल्याने कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी तालुका आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि आज त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं.