Thane News ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवर मंगळवारी मध्यरात्री केमिलक कंटेनर उलटल्याची घटना ताजी असताना, आज बुधवारी पुन्हा पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ ट्रक उलटल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर वाहूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. या वाहतूक कोंडीचा (Traffic Jam)  फटका चाकरमाण्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांना देखील बसला असल्याचे दिसून आले.


सकाळी 10 वाजता शाळेतून निघालेली स्कूल बस सुमारे दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकल्याचे दिसून आले.  त्यातच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्तांची गाडी देखील फसली, तर उलटलेल्या ट्रकमध्ये केमिकलच्या बॅग असल्याने या ठिकाणाहून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांना डोळे चूरचुर्ण्याचा त्रास देखील जाणवू लागल्याची माहिती काही दुचाकीस्वारांनी दिलीय. या अपघातात ट्रक चालक मोहम्मद रुजदार (वय 50 वर्ष) हा किरकोळ जखमी झालाय. तब्बल पाच तासानंतर हा ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करून घोडबंदर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आला आहे. 


24 तासात त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा ट्रक उलटला


मुंबई, ठाणे, उरण, गुजरात आणि नाशिक भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील घाटरस्त्याचे काम प्रस्तावित आहे. गोदामांच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मागापैकी हा एक मार्ग आहे. या मार्गावर अनेकदा अवजड वाहने बंद पडण्याच्या अथवा पलटी होण्याच्या घटना घडत असतात. या घटनांचा परिणाम वाहतुकीवर होवून वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच मंगळवारी मध्यरात्री कंटेनर पलटी होण्याच्या घटनेला 24 तास होत नाही. त्यातच  सकाळी पुन्हा पातलीपाडा उड्डाण पुलावरून ट्रक पलटी झाल्याची घटना समोर आली आहे.


ट्रक चालक रुजदार हा नवीमुंबई न्हावा शेवा येथून पॅराफॉर्मल्डिहाइड केमिकलच्या बॅग असलेला ट्रक घेऊन बावल-हरियाणा येथे निघाला होता. ट्रकमध्ये ३४ टन ८०० किलो वजनाच्या बॅग घेऊन बुधवारी सकाळी घोडबंदर रोडने जाताना पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आल्यावर तो ट्रक उलटला. या अपघातात चालकाच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. यामुळे वाहतुक कोंडी होण्यास सुरुवात झाली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. त्या विभागांनी तातडीने ०३-हायड्रा मशीनच्या मदतीने रस्त्यावरती उलटलेला ट्रक रस्ताच्या एका बाजूला करण्याचे काम हाती घेतले. याचदरम्यान पातलीपाडा ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पातलीपाडा ब्रिजवरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या अपघाताने सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडीचे चित्र पाहण्यास मिळाले.


शाळकरी विद्यार्थी तीन तास कोंडीत


सकाळी साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणपुला जवळ आल्यावर ट्रक उलटला. ट्रक पलटी झाल्यामुळे घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. त्यात सकाळी शाळेत गेलेलं विद्यार्थी शाळेतून सुटल्यानंतर त्यांना देखील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तर, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीत शाळेच्या बसेस तब्बल तीन तास अडकून पडल्याने दुपारच्या स्तरातील विद्यर्थ्याना शाळेत पालकांनाच घेवून जावे लागले. 


 5 तासानंतर ट्रक बजुला


सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ ट्रक उलटल्याची घटना घडली. या घटनेनंतर वाहतूक विभाग, ठाणे पालिकेचे आपत्ती व्यस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे काम हाती घेतले. सुमारे ५ तासाच्या प्रयत्नानंतर हा ट्रक बाजूला करण्यात यश आले असून त्यानंतर या मार्गावारूळ वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. संध्याकाळची परिस्थिती बघता वाहतुक  धीम्या गतीने सुरू आहे.


आणखी वाचा


कोट्यवधींची खैरात होऊनही चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम; आता पादचारी मार्गासाठी 25 कोटींचा प्रस्ताव