मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणात वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही, अशी माहिती सीबीआयने आज मुंबई हायकोर्टात दिली. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात स्कॉटलंड यार्ड कोणतीही मदत करु शकणार नाही, असा अहवाल सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.

भारत आणि इंग्लंडमध्ये अशाप्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक असलेला करार अस्तित्वात नसल्याने, ही असमर्थता स्कॉटलंड यार्डने लेखी स्वरुपात कळवल्याचं सीबीआयने सांगितलं.

गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने तपासाचा प्रगती अहवाल सादर करत, पुढील तपासासाठी आठ आठवड्यांचा अवधी हायकोर्टाकडे मागितला आहे. फरार आरोपींची ओळख पटली असून याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती दिली.



दाभोलकर-पानसरे हत्या: बंदुकीच्या गोळ्यांचा तपास स्कॉटलंड यार्डाकडे


 

दरम्यान सीबीआयने दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जमा केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचा अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबचा सीलबंद बॅलेस्टिक रिपोर्ट हायकोर्टात सादर केला. या अहवालाबाबत कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती जाहीर न करण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, तपास यंत्रणेच्या संथ काराभारावर निषेध नोंदवत दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी, या दोन्ही हत्याप्रकरणातील फरार तसंच संशयित आरोपींचे फोटो हातात घेऊन हायकोर्टाबाहेर मूक आंदोलन केलं.

हायकोर्टात दाभोलकर-पानसरे कुटुंबियाने तपासकार्यावर असहमती नोंदवून तपास चुकीच्या दिशेने आणि संथ गतीने होत असल्याचा आरोप केला आहे. यावर हायकोर्टानेही दोन्ही ठिकाणी सत्र न्यायालयात खटले जैसे थे प्रलंबित असल्याबाबत खंत व्यक्त करत तपास यंत्रणेच्या एकंदरीत काराभारावर नाराजी व्यक्त केली.