पुणे : पुण्यातील शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटानंतर ही वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी भारतीय पुरातत्व विभागाच्या तिजोरीतही भर पडली आहे.
रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट डिसेंबर 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकहाणी या चित्रपटातून उलगडण्यात आली होती.
या चित्रपटात दाखवलेला शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहे. 2016 मध्ये पर्यटकांची संख्येत तीन लाखांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आधी 9 लाख असलेली पर्यटकांची संख्या आता 12 लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये फक्त भारतीयच नाही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
सिनेमात दाखवलेल्या 'शीशमहल'ची नेमकी जागा पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता आहे. 'शीशमहल' सध्या अस्तित्त्वात नाही. पण सिनेमामुळे लोकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे, असं वारसा तज्ज्ञांनी सांगितलं.