मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जीवितहानी देखील होऊ लागलेली आहे. कोरोना विषाणू भारतात आल्यामुळे याची मोठ्या प्रमाणात लागण होऊ नये यासाठी सरकारच्या वतीने खबरदारी घेण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून याचा फटका शैक्षणिक संस्थांना देखील बसलेला आहे. कोरोनामुळे अनेक वर्गांच्या परीक्षाही रद्द करण्यात आलेल्या आहेत. कोरोना विषाणूबद्दलचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांनी एक मोलाचं पाऊल उचललं आहे. या संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु केले आहेत. सध्या वेगवेगळ्या पद्धतीचे ॲप उपलब्ध असल्यामुळे या शैक्षणिक संस्थांनी या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही खाजगी शिकवण्यासह इंग्रजी शाळांनी इयत्ता तिसरीपासून दहावीपर्यंत तर महाविद्यालयांनी अकरावीपासून पदवीपर्यंत विविध वर्ग सुरु केले आहेत. या वर्गांना विद्यार्थी आपल्या घरीच लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून जोडले जात, असून दररोज सकाळी दोन तास अशा पद्धतीने शिक्षक आपल्या घरी बसून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. याचबरोबर विद्यार्थीही शिक्षकांना अभ्यासक्रमासंदर्भातील विविध प्रश्न आणि शंका विचारुन त्यांचे निरसन करत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना घरामध्ये बसूनच येणाऱ्या वर्षातील अभ्यासक्रमाविषयी माहिती देऊन त्यांना महत्त्वाचे धडे शिकवले जात आहेत. याला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत असल्याचे मत शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काही शैक्षणिक संस्था शिक्षक आणि पालक प्रयत्न करत आहेत. या शिक्षण संस्थांनी पालकांना दोन दिवसांपूर्वीच एक सर्क्युलर पाठवला आहे. या सर्क्युलरमध्ये ऑनलाईन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवले जाणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसंच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे आणि पालकांनी त्या कशा उपलब्ध केल्या पाहिजेत या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलं आहे. ज्यांच्या घरी लॅपटॉप अथवा कम्प्युटर नाही त्यांना मोबाईलद्वारे या ऑनलाईन वर्गामध्ये कशा पद्धतीने सहभागी होता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तसेच काही अडचणी असल्यास त्या दूर करण्यासाठी चार ते पाच शिक्षकांचे मोबाईल क्रमांकही देण्यात आलेले आहेत. हे शिक्षक या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऑनलाईन वर्गासंदर्भात मार्गदर्शन करुन त्यांच्या अडचणीही सोडवत आहेत. या ऑनलाईन वर्गाला विद्यार्थी देखील चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे इतर संस्थांनीही याचा अवलंब करणं तितकंच गरजेचं आहे.
शिक्षक आणि पालकांची प्रतिक्रिया
अविरत शेटे ( शिक्षक)
कोरोना हे आपल्या देशावर आलेले संकट आहे. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वच आपल्या घरी आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक वर्गांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काही शैक्षणिक संस्था सरकारसोबत पुढे आल्या आहेत. विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये मार्गदर्शन करत आहेत. या आणि पुढील शैक्षणिक वर्षातील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी ऑनलाईन वर्ग पद्धतीचा वापर करुन आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. एका तासाला दोनशेहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने एकत्र येत असून अनेक शिक्षक या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. या सत्रांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गिरीधर कामत ( पालक)
माझी मुलगी इंग्रजी माध्यमांमध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. अनेक इंग्रजी शाळांमध्ये मे महिन्याची सुट्टी लागण्याआधी एक महिना विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षांचे वर्ग सुरु करण्यात येतो. सध्या कोरोनामुळे शाळा जरी बंद असल्या तरी आमच्या संस्थेने या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु केले आहेत. सध्या सर्वच मुलं मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर सहज करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन क्लासबद्दल त्यांना फारशा अडचणी येत नाहीत. ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळे आम्हा पालक वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.