Yavatmal News यवतमाळ : मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन दरबारी अनेक उपक्रम राबवले जातात. अशातच शिक्षण विभागाच्या (Education Department) मध्यान्ह भोजन योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासह मिलेट्स युक्त पदार्थ देण्याची तजवीज शासनाने केली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील हे चॉकलेट शाळेला सुट्टी आणि निवडणुकीच्या काळात आल्याने विद्यार्थ्यांना वितरित होऊ शकले नाही.


परिणामी, हे चॉकलेटचे बॉक्स शाळेत पडून असल्याचे दिसून येत आहे. हल्ली सर्व शाळांना दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत या चॉकलेटला कीड अथवा खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. तर दुसरीकडे शाळांना सुट्टी लागल्यानंतर चॉकलेटचा साठा अवेळी आल्याने पुरवठादाराचाही गलथानपणा पुढे आला असून शालेय पोषण आहार योजनेचा पूर्णता फज्जा झाल्याचं बोललं जातंय.  


चक्क सव्वा कोटीचे चॉकलेट शाळेत दाखल


राज्य शासनाने मध्यान्ह भोजन योजनेतून शालेय पोषण आहारासह मिलेट्स युक्त चॉकलेट आणले आहेत. हे चॉकलेट बाजरी, रागी, नाचणी, ज्वारी आणि मिक्स फ्रुट पासून तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यात 25 असे तीन टप्प्यात 75 चॉकलेट वितरित करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चॉकलेट अत्यंत लाभदायी असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय. मात्र, मार्च महिन्यात तयार केलेले हे चॉकलेट पुण्यावरून एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पोहोचल्याने शाळेतील शिक्षकांची पंचाईत झाली आहे.


जिल्ह्यातील 2 हजार 700 शासकीय, माध्यमिक, खासगी, अनुदानित शाळांना हे चॉकलेट पोहचली आहेत. या शाळांमधील दोन लाख 56 हजार 841 विद्यार्थ्यांना 1 कोटी 28 लाख 42 हजार चॉकलेट वितरित करण्याचे उद्धिष्ट आहे. मात्र, एकीकडे शाळांना सुट्टी लागल्यानंतर चॉकलेटचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने पुरवठादाराचाही गलथानपणा पुढे आला आहे. 


शालेय पोषण आहार योजनेचा फज्जा


राज्यात जवळ जवळ सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा झालेल्या या चॉकलेटचे नेमकं वितरण कसं करावं हा मोठा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तर काही ठिकाणी  मोठ्या प्रमाणात हे चॉकलेट विद्यार्थ्यांच्या हातात दिले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी चॉकलेट मिळाल्याने विद्यार्थीदेखील अचंबित झाले आहेत. मात्र, मिळालेले चॉकलेट नरम असल्याचे कारण सांगत काही विद्यार्थ्यांनी ते रस्त्यावर फेकून दिल्याचेही समोर आले आहे. आजही दारव्हा मार्गावर हे चॉकलेट रस्त्यांना चिपकून पडल्याचे दिसत आहे. याशिवाय उकिरड्यावरही फेकलेले आहे. हे चॉकलेट खाण्यायोग्य नसावे, असाच काहीसा गैरसमज झाला असून तो गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या