मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्गही 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मंगळवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील इतर शाळांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत जो काही निर्णय होईल त्याला अंतिम मान्यता घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतचे आणि अकरावीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
पुण्यात पहिली ते आठवीच्या शाळा बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज झालेल्या कोव्हिड आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अद्याप पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात लॉकडाऊन लागणार का? धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उद्या मंत्रालयात महत्त्वाची बैठक
- राज्यातील महाविद्यालयं सुरु ठेवायची की नाही? उद्या निर्णय होणार जाहीर
- Pune School : पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय