Bhandara News भंडारा : सजविलेल्या बैलगाड्या आणि डीजेचा घुमणारा आवाज, जणू एखाद्या लग्नाची वरात निघाल्याचा भास होत होता. मात्र, ही वरात नसून आज भंडाऱ्यात सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्या दिवशीची विद्यार्थ्यांची गावफेरी होती. एखाद्या विवाहमध्ये ज्या पद्धतीचा तामझाम असतो, अगदी तसाच तामझाम विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशीच्या शाळेच्या प्रवेशाचा भंडाऱ्याच्या (Bhandara News) पारडी या गावात बघायला मिळाला.


विदर्भातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना आजपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्याचं निर्देश शिक्षण विभागानं दिलं होतं. त्यानुसार भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत अगदी एखाद्या थाटामाटात पार पाडणाऱ्या विवाह सोहळ्याला लाजवेल, अशीच जय्यत तयारी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं केली होती. 


विदर्भात आज शाळेची पहिली घंटा वाजणार


अगदी सकाळपासून ग्रामस्थ आणि शिक्षकांची लगबग इथं बघायला मिळाली. हारतुरे, फुलं आणि फुग्यांनी सजविलेल्या बैलगाडीमध्ये या शालेय विद्यार्थ्यांना बसवून गावफेरी काढण्यात आली. अगदी वाद्याच्या तालावर निघालेल्या या शालेय प्रवेशोत्सवात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावात वाजत गाजत गावातून निघालेली ही फेरी शाळेत पोहोचल्यावर शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचं कुमकुम तिलक लावत मोठ्या उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा काय असते? आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी ग्रामस्थ आणि शाळेनं केलेल्या या उपक्रमाची जिल्ह्यात आता चर्चा रंगू लागली आहे. 


पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्यावरही प्रश्न


केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा (Marathi School Uniform News) लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश (One State One Uniform) उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.


अशातच जिल्हा परिषद, मनपा, खासगी अनुदानित, विनाअनुदानात शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्याची घोषणा सरकारने केली होती. या वर्षी १ जुलैला शाळा सुरू होत असल्याने पुरेसा वेळही मिळाला होता. मात्र, राज्य स्तरावरून कापडच उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यात पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याबाबत अशक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलांना जुन्याच गणवेशात यावे लागेल, अशी स्थिती आहे.


इतर महत्वाच्या बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI