नागपूर जिल्ह्यातील बोखारा परिसरातील तुली पब्लिक स्कूलमध्ये जवळपास अडीचशे गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेच्या परिसरातच त्यांच्यासाठी वसतिगृह आहे. या मुलींसाठी स्वयंपाक करण्यासाठी ठेवलेला आचारी जमीर बापत्ती शाह हा चिमुकल्या विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करतो, असं समोर आल्यानतंर नुकतंच आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली होती.
त्यावेळी काही विद्यार्थीनींनी आचारी त्यांना वाईट पद्धतीने हात लावतो, अश्लील शेरेबाजी करतो, अश्लील गाणे म्हणतो, अशा तक्रारी केल्या. संपूर्ण माहिती समोर आल्यानतंर आदिवासी प्रकल्प अधिकारी देखील हादरले. त्यांनी काल कोराडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आचारी जमीर बापत्ती शाह विरोधात कलम 354 अन्वये विनयभंग आणि लहान बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण (पॉस्को) कायद्याच्या कलम 7, 811 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलंय.
या सर्व प्रकरणानंतरही शाळेनं मात्र अजून मौन बाळगलेलं आहे. घटनेची माहिती समजताच विद्यार्थीनींचे पालक आणि नातेवाईक शाळेच्या समोर पोहचू लागले आहेत. मात्र, त्यांना आपल्या पाल्यांना भेटण्याची संधी तर सोडाच पण फोन वर बोलण्याची संधीही मिळत नसल्याची पालकांची तक्रार आहे.
धक्कादायक म्हणजे विद्यार्थीनींच्या वसतिगृहातील वॉर्डनने मोबाईल फोन बंद करून ठेवला असल्याची माहिती आहे. तर वसतीगृहाच्या लँडलाईन नंबरवर कोणीही प्रतिसाद देत नसल्याची तक्रार आहे.
एबीपी माझाने शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुट्टी असल्याचं कारण देत शाळेच्या प्रवेशद्वारावरच आत जाण्यास मज्जाव करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचं, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीमध्येही होलीक्रॉस शाळेत मुलांसोबत शाळेतील शिपायाने लैंगिक छळाचे दुष्कृत्य केल्याचं प्रकरण समोर आलं होतं.