पुणे : भारताच्या सूर्य मोहमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1)  यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. आदित्य L1 हे भारताचं यान इस्रोच्या (ISRO)  श्रीहरीकोटा इथल्या स्पेस सेंटरमधून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी अंतराळात झेपावलं आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अशाप्रकारे अंतराळात यान पाठवणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला आहे. आदित्य L1 हे यान तयार करण्यात पुण्यातील आयुका संस्थेतील शास्त्रज्ञांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. 


SIUT payload नेमकं काय आहे?


इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (आयुका) या संस्थेने या मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केले आहे. या आयुका संस्थेने विकसित केलेल्या पेलोडचं नाव SIUT payload आहे. SUIT म्हणजेच सौर अल्ट्रा-व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप जे या मोहिमेत सौर प्रतिमा तयार करेल. अल्ट्रा-व्हायोलेट जवळचे इरॅडियन्स व्हेरिएशन्स मोजण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. 


2008 साली सुरुवात...


सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताकडून आदित्य या मोहिमेची 2008 साली सुरुवात करण्यात आली. त्यावेळी या मोहिमेची उद्दिष्ट्ये मर्यादित होती. 2013 मध्ये या मोहिमेला आदित्य L1 हे सुधारित नाव देण्यात आले आणि या मोहिमेची व्याप्ती आणि उद्देश अधिक व्यापक करण्यात आला. आदित्य L1 च्या माध्यमातून सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात येणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर आणि अंतर्भागात होणारे बदल पृथ्वीच्या वातावरणावर आणि पर्यावरणावर परिणाम करत असतात.  या बदलांचा अभ्यास मानवाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. कारण सूर्याच्या तापमानात होणारे बदल पृथ्वीवर परिणाम करतात. भारताकडून अंतराळात अनेक सॅटेलाईट सोडण्यात आले आहेत. सूर्याच्या पृष्ठभागावरुन परावर्तित होणारे अनेक पार्टिकल्स या उपग्रहांना हानिकारक ठरत असतात. आदित्य L1 मुळे या पार्टिकल्सची माहिती आधीच समजणार आहे. 


सूर्यावर झेपावणारी इस्रो ही जगातील तिसरी संस्था


पृथ्वी आणि सूर्य यांच्यात जितके अंतर आहे त्यातील फक्त एक टक्का अंतर आदित्य L1 पार करणार आहे. मात्र सूर्याच्या अभ्यासातील हा महत्वाचा टप्पा असणार आहे. अमेरिकेची नासा आणि युरोपियन युनियनची इसा या दोन संस्थानंतर अशाप्रकारे सूर्याचा अभ्यास करणारी भारताची इस्रो ही जगातील तिसरी संस्था ठरणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Aditya-L1 Mission : शाब्बास! आदित्य एल1 चे प्रक्षेपण, भारताचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु