Savitribai Phule : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजे 10 मार्च 1897 साली झाला. प्लेग पिडितांसाठी काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.
सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांच्या मदतीने पुण्यात पहिल्या मुलीच्या शाळेला सुरुवात केली. त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेचं काम केलं. त्या अर्थी त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील जातीयवाद आणि अन्यायी रुढी परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. अत्याचार, बालविवाह यांच्याविरोधात भूमिका घेतली आणि समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Savitribai Phule Death Anniversary 2021: सावित्रीबाई 'प्लेगयोद्धा' म्हणून लढल्या अन् त्यातच...
ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. . 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ नऊ मुली होत्या.
विधवा स्रियांचे मुंडण करण्याच्या प्रथेवर त्यांनी आसूड ओडला. 1873 साली ज्योतिबांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.
1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. प्लेगच्या गंभीर परिस्थितीत त्या आजारी लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत होत्या. सावित्रीबाई स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सुश्रृषा करीत राहिल्या. असं करत असताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. आपलं आयुष्य समाजसेवेत खर्ची करणाऱ्या सावित्रीबाईंच्या आयुष्याचा शेवटही समाजाच्या भल्यासाठीच झाला. आजही त्यांचे काम भारतातील अनेकजणांना प्रेरणा देतं. 1998 साली भारत सरकारने सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित केलं आहे.
"आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे", राज ठाकरेंची 'मन की बात'