मुंबई: मनसे पक्षाचा 15 वा वर्धापन दिन कोरोना संकटमुळे पक्षाला साजरा करता आला नाही. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त होणार मेळावा आणि त्यात होणार राज ठाकरे यांचे मार्गदर्शन यावर्षी होऊ शकले नाही. यामुळे आजच्या या दिनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करत एक ॲाडिओ मॅसेज पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवला. या ॲाडिओ मॅसेज मध्ये राज ठाकरे यांनी येणाऱ्या काळात पक्षाला भरभरून यश मिळण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.


मनसेच्या 15 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत राज ठाकरे म्हणाले की, "आपण एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 वर्षापूर्वी एका ध्येयाने बाहेर पडून पक्षाची स्थापना केली त्यावेळी मनात धाकधूक होती. महाराष्ट्रासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी केलेली धडपड  तुम्ही आणि लोकं हे कसं स्वीकारणार याची शंका होती."


राज ठाकरे पुढे म्हणतात की, "19 मार्च 2006 पक्ष स्थापना केली. त्या दिवशी शिवाजी पार्कवरची सभा आणि समोर असलेला अलोट जनसागर पाहिला आणि मनातील सर्व शंका दूर झाल्या. मनसे सैनिकांची अचाट शक्ती होती. त्यांचा माझ्यावर अढळ विश्वास आहे. कितीही संकटं, खचखळगे आले तरी मनसे सैनिक रुपी ही शक्ती माझ्यासोबत टिकून आहे. आपल्यातील काहीजण सोडून गेले, त्यांना त्यांचा निर्णय लखलाभ. पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे टणक राहीलात."


पक्षाला भविष्यात जे काही यश ते तुमच्याचमुळे असेल. तुमच्या हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार असं वचन राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलंय. ते म्हणाले की, "मनापासून सांगतो,  15 वर्षात जे काही तुम्ही करुन दाखवलं ते अचाट आहे. कोणतीही धनशक्ती मागे नसताना तुम्ही जे काही केलं ते कौतुकास्पद आहे. तुम्ही हजारो आंदोलनं, मोर्चे, अटकवाऱ्या केल्या. हे सर्व कशासाठी? आपल्या भाषेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्वधर्म रक्षणासाठी."


या सर्वाबद्दल माझ्या मनात कृतज्ञता तर आहेच आणि ती आयुष्यभर राहील. मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या मनातही ती कायम असेल असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले की, "आपण निवडणुकीत यश पाहिलं, पराभव पाहिला. पण या पराभवानंतरही तुमच्या मनातील लढण्याची उर्मी कमी झाली नाही याचा मला खरोखरच अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला जेव्हा असं वाटतं की आपला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण पक्षच सोडवू शकतो त्यावेळी यातच भविष्याच्या यशाची बीजं रोवली आहेत हे विसरू नका. तुमचे श्रम वाया जाणार नाही हे नक्की."


आपला प्रवास खडतर आहे, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे आपल्या पंखात आली आहे आणि त्याच्या जोरावर आपण सर्व आव्हान पेलू असाही विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.  


राज ठाकरे म्हणाले की, "कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे आपण भेटू शकत नाही. सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणे आवश्यक आहे, तुम्हाला भेटता येणार नाही त्यामुळे हा रेकॉर्डेड संदेश तयार केला आहे. ही परिस्थिती निवळली की आपण भेटणार हे नक्की."


या वर्धापन दिनानिमित्त 14 मार्चपासून आपण पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा एकदा सुरुवात करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. सदस्य नोंदणी म्हणजे महाराष्ट्राला दिलेलं आश्वासन, वचन आणि व्यक्त केलेली बांधिलकी आहे असंही ते म्हणाले.


सदस्य नोंदणीचा हा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडीओ येत्या एक दोन दिवसांत मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या या मंगलकार्यात सर्वांना सामावून घ्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.