Save Aarey Protest : आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरून सुरु असलेल्या वादाने रविवारी झालेल्या आंदोलनामुळे वेगळं वळण घेतलं आहे. आंदोलनात लहान मुलांचा वापर झाल्याप्रकरणी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार केली आहे.  


राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवेसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर ताक्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सह्याद्री राईट्स फोरमच्या वतीने करण्यात आली आहे. आरे येथील आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा समावेश केला होता. आदित्य ठाकरे यांनी बाल नाय हक्क संरक्षण कायदा 2015 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सह्याद्री राईट्स फोरमच्या वतीने करण्यात आली आहे. 


राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मेल पाठवत कारवाई करण्याची  मागणी केली आहे. सह्याद्री राईट्स फोरमने पुरावा म्हणून आदित्य ठाकरे यांचं ट्विट मेलमध्ये टाकले आहे. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटमध्ये लहान मुले आंदोलनात सहभागी असल्याचे दिसत आहे. 






आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी रविवारी काही संस्थांकडून आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनात राज्याचे माजी मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाली होते. आदित्य ठाकरेंनी या आंदोलनाचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केले आहेत. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेल्या फोटोत काही लहान मुलांच्या गळ्यात आरे वाचवाच्या पाट्या लावून त्यांना आंदोलनात सहभागी केल्याचे दिसून येते. लहान मुलांना अशाप्रकारे राजकीय आंदोलनात सहभागी करून घेता येत नाही, तसेच लहान मुलांना आंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडणे त्यांच्या मानव-अधिकारांचे उल्लंघन आहे, अशी तक्रार सह्याद्री राईट्स फोरम, या संस्थेने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे दाखल केली आहे. तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) २००० या कायद्याचे उल्लंघन झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेने केली आहे, अशी माहिती फोरमचे संयोजक तन्मय नाईक व कायदेविभागाचे प्रमुख धृतीमान जोशी यांनी दिली आहे. 




लीगल राईट्स ऑबजर्वेटरी या संस्थेने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगासह याप्रकरणी सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेने संबंधित तक्रार महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री , मुंबईचे पोलीस आयुक्त व निवडणूक आयोगाकडे सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे या वादात आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी व नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी या घटनेची तात्काळ दखल घेत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.