बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील ऊसतोड कामगार शेतकरी सखाराम कदम यांच्या मुलींना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मदतीचा हात दिला आहे.


सखाराम कदम यांची मुलगी पल्लवी कदम हिच्या शिक्षणाच्या संघर्षाची कहाणी नुकतीच एबीपी माझाने दाखवली होती. त्याची दखल घेऊन आज (5 मार्च) सतीश चव्हाण यांनी धोंडराई येथे पल्लवी आणि तिच्या दोन बहिणींची भेट घेतली. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

पल्लवी आणि तिच्या बहिणींना महाविद्यालयीन शिक्षणासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोणत्याही महाविद्यालयात मोफत शिक्षण दिलं जाईल, असं सतीश चव्हाण यांनी सांगितलं.

पल्लवी कदमची संघर्ष कहाणी

उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने दर वर्षी मराठवाड्यातील हजारो शेतकरी ऊसतोडणीसाठी जातात. परिणामी त्यांच्या मुलांनाही त्यांच्यासोबत शाळा सोडून जावं लागतं. मात्र अशा परिस्थितीत बीडच्या धोंडराई गावची पल्लवी कदम आपल्या दोन लहान बहिणींसोबत शिक्षणासाठी परिस्थितीशी दोन हात करते.

पल्लवी आपल्या आई वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी न जाता दोन लहान बहिणींसोबत गावातच राहते. तिला शिकून डॉक्टर व्हायचं आहे. म्हणून तिचा आणि तिच्या बहिणींचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी ती सुट्टीच्या दिवशी शेतात मोल मजुरी करते. पाच ते सहा महिन्यांच्या काळात पल्लवी तिच्या दोन बहिणींची जबाबदारी अगदी हिंमतीने पार पाडते.

सातवीत शिकणारी पल्लवी शाळेतही तेवढीच हुशार आहे. पल्लवीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तिच्या शाळेतील शिक्षक तिला नेहमी मदतीचा हात पुढे करतात. शाळेत होणाऱ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ती तेवढ्याच उमेदीने सहभागी होते. तिच्या मैत्रिणीही तिला अभ्यासात मदत करतात.

पल्लवीला एकूण चार बहिणी आहेत, त्यापैकी एकीचं लग्न झालंय तर दोन शाळेत शिकत आहेत. एक लहान बहिण आणि तिचा भाऊ हे आई वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी जातात. पण पल्लवी एकटीच राहून आपल्या दोन बहिणींसोबत शिक्षण पूर्ण करण्यासाठी परिस्थितीचा सामना करते.

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासनाकडून हंगामी वसतीगृह चालवली जातात. मात्र ती अगदी तोडक्या स्वरूपात आहेत. त्यामुळे पल्लवीसारख्या होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या जिद्दीला बळ मिळालं, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातला कोयता जाऊन लेखणी आल्याशिवाय राहणार नाही.

पाहा व्हिडिओ : मराठवाड्याची संघर्षकन्या... पल्लवी कदम!