कल्याण : मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीसह अनेक ठिकाणी रिक्षावाल्यांची वाढती मुजोरी अजिबात सहन केली जाणार नाही, अशा कडक शब्दात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दरडावलं आहे. भिवंडी आणि कल्याणमध्ये एसटी चालक तसंच पोलिसांवर रिक्षाचालकांनी हात उगारण्याच्या घटना नुकत्याच घडल्या. त्या पार्श्वभूमीवर दिवाकर रावतेंनी कल्याणला भेट दिली.


रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मुजोरी मोडून काढण्याबाबत हायकोर्टाने आदेश दिले आहेत. त्याचं आम्ही काटेकोर पालन करुच. मात्र आमचे एसटी चालक किंवा कर्मचाऱ्यांना कोणीही हात लावला तर त्यांची गय केली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दात रावतेंनी समज दिली.

कल्याण आणि भिवंडीमध्ये एसटी चालक, वाहतूक पोलिस यांना मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षा परिवहन मंत्र्यांच्या समक्ष तोडण्यात आल्या. आमच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर हात टाकाल, तर हेच परिणाम भोगावे लागतील, असा काहीसा इशारा मुजोर रिक्षाचालकांना देण्यात आल्याचं म्हटलं जातं.

आम्हाला रिक्षाचालकांच्या व्यवसायाचा आदर आहेच. मात्र मुजोर रिक्षाचालकांना त्यांच्या संघटनांनी धडा शिकवला पाहिजे, म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत, अशी अपेक्षाही दिवाकर रावतेंनी व्यक्त केली.