कोल्हापूर : सतेज पाटील हे खरोखर सांताक्लॉज आहेत. ज्यांची इच्छा असते ती सतेज पाटील पूर्ण करतात. म्हणजे ज्या विभागाला ज्या कामासाठी निधी पाहिजे तो निधी ते लगेच देतात. त्यामुळे कोणत्या लोकप्रतिनिधीला कोणत्या कामासाठी किती निधी लागणार हे सतेज पाटील यांना माहीत असते. गेल्या दोन वर्षात त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास केला आहे अशा शब्दात राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सतेज पाटलांची स्तुती केली आहे. ते विधानपरिषदेच्या मेळाव्यात बोलत होते.
विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील सहा ठिकाणी विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. या सर्व जागांमध्ये सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर होय. कारण कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निमित्ताने सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंबीय आमने-सामने येणार आहेत. आज सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सतेज पाटील यांचा अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित होते. विधानपरिषदेचा अर्ज दाखल केल्यानंतर एक मेळावा देखील पार पडला. या मेळाव्यामध्ये विविध नेत्यांनी आपली भाषणे केली. मात्र यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या भाषणाची चर्चा जोरदार सुरु झाली. कारण मंडलिक यांनी सतेज पाटील म्हणजे सांताक्लॉज आहेत. ज्याच्या मनात जे आहे ते पूर्ण करतात अशी टिप्पणी केली. मंडलिक यांच्या भाषणाचा धागा पकडून उदय सामंत आणि हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
खासदार संजय मंडलिक यांच्या भाषणाचा धागा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील पकडला. उपस्थित मतदारांना सहलीला जावा, कोरोनात काम करून थकला असणार बाकी आपला सांताक्लॉज बघून घेईल अशी मिश्कील टिप्पणी मुश्रीफ यांनी केली. यावेळी सभागृहात एकाच हशा पिकला.
या मेळाव्यात सतेज पाटील यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा दाखल मतदारांसमोर ठेवला. गेल्या वेळी युतीची सत्ता असताना देखील आपला विजय झाला आहे. आता तर शिवसेना देखील आपल्या सोबत आणि तीन पक्षाचे सरकार देखील आपलेच आहे. त्यामुळे 270 पेक्षा अधिक मतदार आपल्या बाजूनं असल्याचा दावा देखील यावेळी सतेज पाटील यांनी केला.
संबंधित बातम्या :
- Vidhan Parishad Election : कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या विरोधात कोण? भाजपचा उमेदवार कोण असणार?
- Vidhan Parishad Election 2021 : पुन्हा धुरळा उडणार, विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर!
- Shivsena MLC : सुनिल शिंदे, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, सुरज चव्हाण की राहुल कनाल ?; शिवसेनेत विधानपरिषदेच्या एका जागेसाठी रस्सीखेच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha