Vidhan Parishad Election 2021 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळणार आहे.  या निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी एकत्र लढणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी काँग्रेसने अनेकवेळा स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे प्रत्येक पक्ष आपआपलं बळ दाखवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मोठी चुरशीची होणार हे निश्चित आहे. 


दहा डिसेंबरला मतदान
निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर या जागांचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होईल.


या सहा जागांसाठी मतदान होणार
रामदास कदम, शिवसेना, मुंबई
भाई जगताप, काँग्रेस, मुंबई
सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर
अमरीश पटेल , भाजप, धुळे-नंदुरबार
गिरिश व्यास, भाजप, नागपूर
गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना अकोला, बुलढाणा, वाशिम


या दोन जागांसाठी अद्याप मतदान नाही.
प्रशांत परिचारक, भाजप, सोलापूर
अरूणकाका जगताप, राष्ट्रवादी, अहमदनगर


विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेत रस्सीखेच
आगामी काळात होणा-या विधानपरिषेदच्या जागेसाठी शिवसेनेत अनेकांनी नंबर लावले आहेत. यात अनेक नेत्यांचे पुर्नवसन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर काही पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार का बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देणार अनेकांची नावं ही चर्चेत आहेत. माजी मंत्री व शिवसेना जेष्ठ नेते रामदास कदम हे सध्या विधान परिषदेत शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत पुढील वर्षीच्या पहिल्याच महिन्यात संपणार आहे. मात्र, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्याला विधान परिषदेत आणलं जाणार आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या उमेदवाराची निवड केली जाणार असल्याचं समजतं.


शिवसेनेकडून कोणत्या नावाची चर्चा
विधान परिषद आमदारकीसाठी शिवसेनेत  सचिन अहिर, सुनील शिंदेसोबत किशोरी पेडणेकरांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे तिधेही आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात येतात त्यामुळे आदित्य ठाकरे स्वत:चं मंत्रीपद, पक्ष संघटना आगामी निवडणुका लक्षात ठेवता मतदार संघातला चेहरा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनील शिंदे यांच्या नावाला अधिक पसंती शिवसेना नेते तसेच शिवसैनिकांमध्ये आहे कारण वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार असताना त्यांनी ती जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडली होती.  सचिन अहिर हे वरळी मतदार संघातील माझी आमदार होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आदित्य ठाकरे यांचा मार्ग मोकळा केला होता. अहिर यांच्याकडे मुंबईत कार्यकर्त्यांच मोठे जाळे आहे. अहीर हे माजी मंत्री देखील होते शिवसेनेत आल्यापासून त्यांना कोणतेही मोठे पद अद्याप देण्यात आलेले नाही त्यामुळे यांच्याही नावाची चर्चा सध्या आहे. त्याचबरोबर शिवसेनेसोबत युवा सेनेचंही वजन चांगलंच वाढलं आहे. या सर्वांमध्ये मिलिंद नार्वेकर हा शिवसेनेतला सर्वांत जुना आणि पडद्यामागच्या हालचालींमध्ये ओळखला जाणारा चेहरा आहे, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक ते शिवसेना सचिव असा प्रवास नार्वेकरांचा झालाय, त्यात सर्वच पक्षांशी असलेले संबंध शिवसेनेला निवडणुकांच्या वेळेला कामाला आले आहेत, गेली अनेक वर्ष नार्वेकर यांना आमदारकीची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.