मुंबई: आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषेदच्या एका जागेसाठी शिवसेनेत अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विधानपरिषदेत नेत्यांचे पुर्नवसन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर काही पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार का, बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देणार यातच अनेकांची नावं ही चर्चेत आहेत. माजी मंत्री व शिवसेना जेष्ठ नेते रामदास कदम हे सध्या विधान परिषदेत शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत पुढील वर्षीच्या पहिल्याच महिन्यात संपणार आहे. मात्र, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्याला विधान परिषदेत आणलं जाणार आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या उमेदवाराची निवड केली जाणार असल्याचं समजतं.


कोणाच्या नावाची चर्चा ?


विधान परिषद आमदारकीसाठी शिवसेनेत  सचिन अहिर, सुनील शिंदेसोबत किशोरी पेडणेकरांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. हे तिघेही आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात येतात. त्यामुळे आदित्य ठाकरे स्वत:चं मंत्रीपद, पक्ष संघटना आगामी निवडणुका लक्षात ठेवता मतदार संघातला चेहरा देण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


सुनील शिंदे यांच्या नावाला अधिक पसंती शिवसेना नेते तसेच शिवसैनिकांमध्ये आहे. वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार असताना त्यांनी ती जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडली होती. सचिन अहिर हे वरळी मतदार संघातील माजी आमदार होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आदित्य ठाकरे यांचा मार्ग मोकळा केला होता. अहिर यांच्याकडे मुंबईत कार्यकर्त्यांचं मोठे जाळे आहे. अहिर हे माजी मंत्री देखील आहेत. शिवसेनेत आल्यापासून त्यांना कोणतेही मोठे पद अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे विधानपरिषदेसाठी त्यांच्याही नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर शिवसेनेसोबत युवा सेनेचंही वजन चांगलंच वाढलं आहे. या सर्वांमध्ये मिलिंद नार्वेकर हा शिवसेनेतला सर्वांत जुना आणि पडद्यामागच्या हालचालींमध्ये ओळखला जाणारा चेहरा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक ते शिवसेना सचिव असा प्रवास नार्वेकरांचा झालाय, त्यात सर्वच पक्षांशी असलेले संबंध शिवसेनेला निवडणुकांच्या वेळेला कामाला आले आहेत. गेली अनेक वर्ष नार्वेकर यांना आमदारकीची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांवेळी नार्वेकराना संधी दिली जाणार अशी चर्चा होती पण त्यावेळी संधी हुकली. पण यंदा नार्वेकर या संधीचं सोनं करतील अशी चिन्ह आहेत.  युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, राहुल कनालसारख्या चेहऱ्यांचीही पक्षात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. युवा सेनेचे हे दोन चेहरे आदित्य ठाकरेंच्या जवळचे आहे तसेच आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात. 


नव्या चेहऱ्याचा शोध


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास कदम यांच्या जागी आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरु झाला आहे. रामदास कदम यांची विधान परिषदेचे मुदत 2022 ला संपत आहे. त्यांचे सदस्यत्व कायम ठेवले जाणार नसल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. पक्षाला उपयोगी पडणारा, नियम न तोडणारा, आणि तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. विधान परिषदेत रामदास कदम यांच्याजागी विभागप्रमुख किंवा युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.