Santosh Parab Case: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी अटक होऊ नये यासाठी जिल्हा बँक संचालक मनीष दळवी (Manish Dalvi) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काम पाहिले. तर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचे खाजगी स्विय्य सहाय्यक राकेश परब  (Rakesh Parab) यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर 11 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.


कणकवली शहरातील नरडवे तिठ्यावर 18 डिसेंबर रोजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणी चेतन पवार, करण कांबळे, अनिल नक्ता, करण कांबळे, दीपक वाघोळे, सचिन सातपुते या सहा आरोपीना अटक केली आहे. यातील सचिन सातपुते याला न्यायालयीन कोठडी झाली आहे. तर धीरज परब, ज्ञानेश्वर माऊली असे दोन आरोपी फरारी आहेत. याशिवाय भाजप आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर 7 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तर जिल्हा बँक संचालक मनीष दळवी व नितेश राणे यांचे स्विय्य सहाय्यक राकेश परब यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोघांनी सुद्धा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.


यातील मनीष दळवी यांच्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे विशेष वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना मनीष दळवी यांचा आरोपींशी मोबाईलद्वारे संवाद झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने मनीष दळवी यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला आहे. तर राकेश परब यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही. ती 11 जानेवारी रोजी होणार आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha